Digha Railway Station and Uran Kharkopar Local Train :  गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या दिघा रेल्वे स्थानकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मागील काही महिन्यांपासून हे स्थानक तयार झाले होते. मात्र, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर नवी मुंबईतील ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचे (Digha Railway Station) उदघाट्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तर,  उरण ते खारकोपर (Uran to Kharkopar Local Train) या दरम्यान लोकल सेवेचेही उद्घाटन करण्यात आले. आज झालेल्या उद्घाटनामुळे ठाणे आणि नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.  दिघा रेल्वे स्थानक आणि उरण ते खारकोपर या दरम्यान लोकलचे उद्घाटन करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक शिवडी-न्हावा शेवा लिंकचे उद्घाटन केले. 



उरण, नवी मुंबई विमानतळ परिसरातील नागरिकांना दिलासा


खारकोपर आणि उरण दरम्यान आता लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढणार आहेत. यानंतर आता लोकल ट्रेनच्या 40 फेऱ्या या स्थानकांदरम्यान धावणार आहेत. आधीच नेरूळ आणि बेलापूरपासून खारकोपरपर्यंत दिवसाला 20 लोकल फेऱ्या सुरू आहेत. यातील काही लोकल उरण पर्यंत चालवण्यात येतील. तर काही नवीन लोकल फेऱ्या चालवल्या जातील. यामुळे नवी मुंबई विमानतळ, उरण या पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना लोकलने हार्बर मार्गावर येता येणार आहे. 


महामुंबईतील प्रवाशांसाठी 400 किमीपर्यंत लोकल विस्तार करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात केली होती. हा विस्तार पूर्ण करण्यासाठी बेलापूर-उरण मार्ग, कर्जत-पनवेल नवीन रेल्वेमार्ग, विरार-डहाणू चौपदरीकरण या प्रकल्पांची पूर्ती होणे गरजेचे आहे. मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या प्रकल्पात बेलापूर-खारकोपर-उरण मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे महामुंबईतील नवी शहरे लोकलच्या टप्प्यात येणार आहेत.



दिघा रेल्वे स्थानकासाठी 428 कोटींचा खर्च (Digha Railway Station)


ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा या नव्या रेल्वे स्थानकाची (Digha Railway Station)  भर पडणार आहे. ठाणे ते ऐरोली स्थानकांदरम्यान दिघा हे स्थानक उभारण्यात आले  आहे. आज पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. दिघा रेल्वे स्थानकासाठी 428 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. दिघा परिसरात मोठी लोकवस्ती असून, तिथं आयटी कंपन्याही आल्या आहेत. पण या स्थानकावर आजवर ट्रेन थांबत नव्हती. त्यामुळे रहिवाशी आणि नोकरदारांना ठाण्याला येण्यासाठी रिक्षा किंवा बसचा वापर करावा लागत होता. तसेच दिघा एमआयडीसीमध्ये  येणाऱ्या कामगार वर्गाला ऐरोली स्थानकात उतरावे लागत होते.


दिघा रेल्वे स्थानक उद्घाटनात मानपमान नाट्य 


ठाण्याचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांचे नाव दिघा रेल्वे स्थानक (Digha Railway Station) लोकार्पण कार्यक्रमपत्रिकेतून वगळण्यात आले आहे. दिघा रेल्वे स्थानक बांधण्यात यावे आणि सुरू व्हावे यासाठी विचारे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, त्यांचे नाव वगळण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. खासदार राजन विचारे यांनी शिवसैनिकांसह दिघा रेल्वे स्थानकात हजेरी लावली. त्यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाली. 


ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मतदारसंघात असलेला दिघा गाव रेल्वे स्थानक आहे. त्याशिवाय, बेलापूर ते पेंधर सुरू झालेली मेट्रो प्रकल्पही त्यांच्या मतदारसंघातील आहेत. मात्र, लोकप्रतिनिधीची नावे वगळून इतर नावे टाकण्याचा कळस या सरकारने केला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला. 


दिघा स्टेशनसाठी आपण पाठपुरावा करून प्रकल्प कार्यान्वित केला आहे. आता त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना स्थानिक खासदार म्हणून निमंत्रण देण्याची प्रथा आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेत आपल्याला डावलले असून आजचा कार्यक्रम पक्षाचा आहे की शासनाचा यावर प्रश्न उपस्थित होत असल्याचे खासदार राजन विचारे यांनी म्हटले.