MLA Disqualification Case: नागपूर : आमदार आपत्रता प्रकरणाच्या (MLA Disqualification Case) सुनावणीला आज (शुक्रवारी) 20 मिनिटं उशिरानं सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आणि त्यासोबतच दोन्ही बाजूंचे वकील सुनावणीसाठी उपस्थित होते. मात्र साक्षीदार असलेले शिंदे गटाचे (Shinde Group) दिलीप लांडे (Dilip Lande) सुनावणीसाठी 20 मिनिटं उशिरानं सुनावणीसाठी पोहोचले. दिलीप लांडेंना उशीर झाल्यानंच सुनावणी विलंबानं सुरू झाली. दरम्यान, ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामतांच्या विनंतीनंतर साक्षीदारानं केलेला उशीर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी रेकॉर्डवर आणला.


आज आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत काय होणार? 



  • आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत आज सकाळच्या सत्रात शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष नोंदवली जाणार 

  • दुसऱ्या सत्रात शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांची  उलटतपासणी 


आमदार अपात्रततेची सुनावणी आज दोन सत्रात 


आज आमदार अपात्रतेची सुनावणी दोन सत्रांत पार पडणार आहे. सकाळी पहिलं सत्र तर दुसरं सत्र दुपारी अशा दोन सत्रांत सुनावणी पार पडणार आहे. दुपारची सुनावणी 2 ते 6 या वेळेत होणार आहे. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. उलट साक्ष घेण्यासाठी ठाकरे गटास एका दिवसाची मुदत वाढ देण्यात आली आहे. तर विधानसभा अध्यक्ष शनिवार आणि रविवारीही सुनावणी घेणार आहे. 


कसं असेल सुधारित वेळापत्रक? 



  • 8, 9, 11, 12 ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाईल

  • दोन्ही गटांना 13 ते 15 डिसेंबर या काळात लेखी म्हणणं मांडता येईल

  • 16 ते 20 डिसेंबर या काळात अंतिम सुनावणी घेतली जाईल

  • एकूणच दिवस-रात्र सुनावणी घेतल्यामुळे निकाल वेळेआधी लागण्याची शक्यता आहे.


दिलीप लांडेंची साक्ष नोंदवण्यास सुरुवात, काय-काय झालं? 


कामत : 3 जुलै 2022 रोजी शिवसेना आमदार राजन साळवी हे विधनासभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून उमेदवार होते का ? 


दिलीप लांडे : राहुल नार्वेकर हे शिवसेना पक्षाचे विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार होते 


कामत - 2 जुलै 2022 ला शिवसेना आमदार होते का?


दिलीप लांडे : मी नवीन असल्याने सर्व सदस्यांना ओळखत नाही 


कामत : राजन साळवी हे विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार होते म्हणून तुम्ही हे उत्तर देत नाहीये ?


लांडे : मी नवीन असल्यामुळे मी सर्व सदस्यांना ओळखत नाही


कामत : rajgadbank9@mail.com  हा इमेल अड्रेस आपण ओळखता का? 


लांडे : हो...माझा आहे परंतु माझ्या मतपेढीचा आहे


कामत : याच इमेल आयडीवर 2 जुलै दुपारी 2 वाजून 42 मिनिटांनी सुनील प्रभू यांनी पाठवलेले 2 पक्षादेश मिळाले आहे का?


लांडे : मी मुंबईत नव्हतो, मला माहित नाही. माझ्या भावाने दिलेल्या माहितीप्रमाणे विजय जोशी यांच्या नावाने मेल पाठवला होता.


देवदत्त कामत : आपण 3 जुलै 2022 रोजी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी पाठवलेल्या व्हीपचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आपण अपात्रता कारवाईसाठी पात्र आहात. हे चूक की बरोबर? 


दिलीप लांडे : मला सुनिल प्रभू यांनी कुठलाही व्हीप पाठवला नाही.


कामत : 4 जुलै 2022 रोजीचा भरत गोगावले यांनी जारी केलेला कथित पक्षादेश कसा मिळाला ?


लांडे : माझ्या हातात दिला


कामत : कथित पक्षादेश आपल्या हातात केंव्हा ठेवण्यात आला ?


लांडे : मला वेळ आठवत नाही. मला तारीख आठवते 4 जुलै 


कामत : कथित व्हीप तुम्हाला तुमच्या हातात दिल्यानंतर तुम्ही त्याची पोचपावती दिली का ?


लांडे : आठवत नाही


कामत : 4 जुलै 2022 विश्वास दर्शक प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी भरत गोगावले यांनी कुठलाही व्हीप जारी कुठल्याही सदस्याला दिला नव्हता हे खरं आहे का ?


लांडे : मला दिला आहे हे मी कबूल केलं आहे


कामत : 4 जुलै 2022 रोजीच्या विश्वास दर्शक ठरावात आपण एकनाथ शिंदे यांना मतदान केले जे भाजप पक्षाच्या पाठींबाने सरकार बनवत होते ? हे बरोबर आहे का?


लांडे : हे बरोबर आहे 


कामत : 2 जुलै 2022 रोजी सुनील प्रभू यांनी पक्षाकडून जो पक्षादेश दिला होता त्याचे तुम्ही उल्लंघन करून तुम्ही अपात्रता ओढवून घेतली आहे ?


लांडे : मला सुनील प्रभू यांनी कुठलाही व्हीप पाठवला नाही मिळालं नाही


कामत : 20 जून आणि 21 जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होतात का?


लांडे : मी गेली 25 वर्षे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे


कामत : म्हणजे तुम्ही 20 आणि 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होतात?


लांडे : मी 20 जून या तारखेला त्यांना भेटलो होतो. मी 20 तारखेला मतदान होत म्हणून तिथे त्यांना भेटलो 21 जूनला भेटलो नाही


कामत : 20 जून 2022 नंतर तुम्ही 24 जून 2022 पर्यत एकनाथ शिंदे यांच्या सोबत तुमचा कुठलाही संपर्क नव्हता? हे बरोबर आहे का?


लांडे : बरोबर आहे


कामत : 20 ते 30 जून 2022 दरम्यान तुम्ही मुंबईत होतात का?


लांडे : आठवत नाही, 20, 21 आणि 22 तारखेला मुंबईत होतो


कामत : 22 जून ते 30 जून 2022 दरम्यान तुम्ही महाराष्ट्र बाहेर प्रवास केला आहे का? 


लांडे : हो


कामत : 22 जून ते 20 जून 2022 दरम्यान तुम्ही महाराष्ट्र बाहेर कुठे गेला होता? हे सांगू शकाल का?


लांडे : ही माझी खाजगी माहिती आहे, ती मी सांगू शकत नाही...मी कुठेही फिरू शकतो


कामत : 22 जून ते 30 जून 2022 दरम्यान तुम्ही सुरत आणि गुवाहाटी ला गेला होतात का?


लांडे : मी आधीच सांगितलं की ही माझी खाजगी माहिती आहे. मी कुठे फिरायचं हा माझा अधिकार आहे.


कामत  : 21 जून आणि 22 जून 2022 रोजी तुम्ही वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्याना मुलाखती दिल्या का? ज्यामध्ये तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि एकनाथ शिंदे यांना आपण पाठींबा देत नाहीत असं मुलाखतीत बोलले होते का? 


लांडे : आठवत नाही


कामत : सुरत आणि गुवाहाटी मध्ये किंवा महाराष्ट्र बाहेर ज्या हॉटेल मध्ये तुम्ही राहत होतात याचे भाडे भाजप पक्षाने दिले का?
हे खरे आहे का ?


लांडे : मी स्वतः गेलो होतो, मी कुठे राहिलो कुठे गेलो याची माहिती मी कोणाला देऊ शकत नाही


कामत : 22 ते 30 जून दरम्यान महाराष्ट्र बाहेरील प्रवास खाजगी चार्डड प्लेन ने गेला होता का? 


लांडे : ही माझी खाजगी जीवनाची माहिती आहे. मी रिक्षा चालवत गेलो का किंवा मी बैलगाडीत गेलो हे मी सांगू शकत नाही.


शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत सुरत-गुवाहाटीचा मुद्दा चर्चेत


शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत सुरत-गुवाहाटीचा मुद्दा चर्चेत आहे. आमदार दिलीप लांडे यांचा माहिती देण्यास नकार आहे. गुवाहाटी आणि सूरत येथील प्रवासाची माहिती देण्यास नकार दिला आहे. ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांच्या प्रश्नांना लांडे यांकडून बगल देण्यात आली. सूरत आणि गुवाहाटी येथे गेला होता का? हॉटेलचे भाडे भाजपनं भरलं का? देवदत्त कामत यांच्याकडून दिलीप लांडेंवर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. दिलीप लांडे यांच्याकडून खासगी माहिती असल्याचं सांगत बचाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 


कामत : 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत जी सही तुम्हला दाखवतो ती तुम्हीच केली आहे का? 


लांडे : बरोबर आहे. तुम्ही जे कागदपत्र दाखवताय. या कागदपत्रावर हाताने वरच्या बाजूस काहीतरी लिहिले आहे. माझी सही झाल्यानंतर पक्षादेश क्रमांक 2/2022 असे लिहिलेले आहे असे मला वाटत. 


कामत : 21 जून 2022 ला व्हीप जारी झाला जो सुनील प्रभू यांच्या कडून मिळाला होता. म्हणून तुम्ही त्या बैठकीला उपस्थित होता? हे खरे आहे का? 


लांडे : मला गुलाबराव पाटील नावाच्या व्यक्तीने फोन केला होता म्हणून मी त्या बैठकीला उपस्थित होतो


कामत : 21 जून 2022 रोजी वर्षा निवासस्थानी जी बैठक बोलावली त्या बाबत जो व्हीप मिळाला याची पोचपावती दिली होती का?


लांडे : मी आधीच सांगितले की 21 तारखेच्या बैठकीसाठी गुलाबराव पाटील यांचा फोन आला होता


(शिवसेना विधिमंडळ कार्यालयाच्या लेटरहेडवरील 21 जून 2022 च्या कागदपत्रावर साक्षीदाराला या संदर्भातील साक्षीदाराची सही दाखवली गेली)


कामत : या कागदपत्रवर जी सही केली गेली आहे ते तुमचीच आहे का ? 


लांडे : हो


कामत : 21 जून 2022 च्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व उपस्थित आमदारांच्या पाठींब्याने बैठकीत एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदावरून हटवले हे खरे आहे का ? 


लांडे : आठवत नाही


कामत : याच बैठकीत उपस्थित आमदारांच्या पाठींब्याने अजय चौधरी यांनी उद्धव ठाकरे यांनी नेमणूक केली...हे बरोबर आहे का ? 


लांडे : आठवत नाही


कामत : 21 जून 2022 रोजी वर्षावर सुरू असलेल्या बैठकीत उपस्थित आमदारांना मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते याची कल्पना दिली नव्हती ? 


लांडे : दिली होती


कामत : 20 जून ते 30 जून 2022 दरम्यान एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवली होती का ? ज्यामध्ये भाजपला साथ द्यायचे ठरले ? 


लांडे : हो बैठक झाली


कामत : राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक कुठे आणि केव्हा झाली


लांडे : आठवत नाही


कामत : राष्ट्रीय कार्यकारणीच्या सदस्यांना या बैठकीबाबत नोटीस पाठवली होती का? 


लांडे : माहीत नाही


कामत : 20 जून ते 30 जून 2022 दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून कुठलीही राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली नव्हती? हे चूक की बरोबर?


लांडे : लक्षात येत नाही


कामत : याच दरम्यान प्रतिनिधी सभा किंवा या बाबत बैठक एकनाथ शिंदे यांनी बोलवली होती का?


लांडे : आठवणीत येत नाही


कामत : तुम्ही 22 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर शिवसेना विधीमंडळ पक्षाची एखादी बैठकीला उपस्थित होते का? 


लांडे : हो


कामत : या बैठकीचे अध्यक्ष अजय चौधरी होते का? 


लांडे : असे नव्हते, पक्षाच्या नेते मंडळींची बैठक होती. 22 जून 2022 रोजी उपस्थित आमदारांची अटेंडन्स शीट साक्षीदाराला दाखविण्यात आली.


कामत : 22 जून 2022 रोजी वर्षावर झालेल्या बैठकीत जी अटेंडन्स शीट दाखवली जात आहे त्यावर आपण सही केली का?


लांडे : हो... परंतु, विधिमंडळ सदस्यांच्या सह्या यादीवर घेतलेल्या असतात. आमची यादी बनवली आणि सह्या घेतल्या बैठकीच्या उपस्थितीनंतर पेनानं लिहिलिलं आहे. मला यातून निदर्शनास आणून द्यायचे आहे की, विधानसभा सदस्यांच्या सह्या यादीवर आधी घेण्यात आल्या. 


कामत : उदय सामंत आणि वैभव नाईक यांनी नंतर येऊन या बैठक उपस्थित पत्रावर 22 जून 2022 रोजी सही केली होती हे खरं की खोटं?


लांडे : मला माहित नाही


पहिल्या सत्रातील सुनावणी पूर्ण 12 नंतर प्रश्न-उत्तराच्या तासानंतर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष यांनी सुनावणीसाठी बोलवलं आहे. 


दरम्यान, 21 जून 2022 रोजी वर्षा निवासस्थानी शिवसेना विधिमंडळ पक्षाकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचा व्हीप प्राप्त झाल्या असल्याच्या पोच पावतीवर आमदार दिलीप लांडे यांची सही आहे. दुसरीकडे मात्र सुनावणी दरम्यान दिलीप लांडे यांनी यासंदर्भात उत्तर देताना मला सुनील प्रभू यांचा व्हीप प्राप्त झाला नव्हता आणि गुलाबराव पाटील यांनी फोन केल्यानंतर मी बैठकीत उपस्थित राहिल्याचं सांगितलं आहे.