Thackeray Group Letter TO Central Election Commission: धर्माच्या नावावर निवडणुकीत मतं मागण्यास निवडणूक आयोगाची (Election Commission) परवानगी आहे आणि अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचा भंग होत नाही, असं आम्ही आता गृहित धरायचं का? अशी थेट विचारणा शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (ShivSena - Uddhav Balasaheb Thackeray) पक्षानं स्मरणपत्राद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. 


नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी उघडपणे धर्माच्या नावानं प्रचार केला. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 16 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून जाब विचारला होता. या पत्राला निवडणूक आयोगाकडून अद्याप उत्तर न आल्यानं ठाकरे गटानं आता केंद्रीय निवडणूक आयोगाला पुन्हा स्मरणपत्र लिहिलं आहे. 


पत्रात नेमकं काय?


निवडणूक काळात जाहीर प्रचारसभांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून धार्मिक आधारावर उघडपणे केली जाणारी आवाहने, धर्माच्या नावावर मागितली जाणारी मते यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते की नाही याविषयी निवडणूक आयोगानं एकदाचे स्पष्टीकरण द्यावं आणि भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.


आधीच्या पत्रावर आयोगानं अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मग, निवडणूक प्रचारात धर्माच्या आणि देव-देवतांच्या नावावर मतदारांना आवाहन करत मते मागण्याची सरसकट परवानगी आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिली आहे, असं आम्ही गृहित धरायचं का? अशा प्रचारानं आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत नाही, असं आम्ही मानायचं का? अशी विचारणाही ठाकरे गटानं केली आहे.


यासंदर्भात आयोगाची जी काही भूमिका असेल त्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचं कृपया आपण प्रबोधन करावं, असं आवाहनही ठाकरे गटानं स्मरणपत्रातून आयोगाला म्हटलं आहे.