चंदगड (जि. कोल्हापूर) : गुलाबी यात्रा पुढं गेली की मागून गळती लागते. गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तोफ डागली. गडहिंग्लज तालुक्यामधील नेसरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसन्मान यात्रा पोहोचली. नंदाताई बाभूळकर चंदगड या मतदारसंघातून इच्छूक आहेत. अमोल कोल्हे म्हणाले की, ईडी आणि सीबीआयला घाबरून अनेकांनी भूमिका बदलल्या, पण महाराष्ट्र कधी विकला जात नाही, झुकत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं. इतकंच नाही, तर दिल्लीच्या बापासमोर झुकत नाही हे लोकसभेला महाराष्ट्राने दाखवून दिलं.
ते पुढे म्हणाले की, वेढ्यात मराठी वीर दौडले सात हेच याच भूमीत घडलं होतं. स्वामी निष्ठा काय असते हे याच मातीने दाखवले. त्याच मातीत दोघांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली त्यांना स्वाभिमानी जनता जागा दाखवतील. 60 ते 62 विधानसभा मतदार संघात तुतारीचा आवाज येत आहे. आज वेळ तुमची असेल तर येणारा काळ आमचाच असल्याचे ते म्हणाले.
नंदाताई बाभूळकर काय म्हणाल्या?
नंदाताई म्हणाल्या की, शेतकऱ्याने ऊसाच्या जमिनी पिकाच्या जमिनी गवत लावायसाठी 800 ते हजार रुपये गुंठ्यांना भाडेतत्त्वावर दिल्या. जाचक असा जीएसटी कर, शेतीमालाला हमीभाव नाही, विजेची बिल वाढली आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढत आहेत. महिलांची परिस्थिती अगदी वेगळी नाही. मुलं चांगलं शिक्षण मुलं घेतात, उच्चशिक्षित व्हायला लागलेत पण आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही. उच्च शिक्षित मुलं नोकरीसाठी पुण्या मुंबईकडे जात आहेत. बिन लग्नाची मुलं फिरत आहेत. तुमच्या आणि माझ्या घरातील मुला मुलींच्या नोकऱ्या या आज गुजरातमध्ये गेल्या आहेत, ही सत्य परिस्थिती आहे. प्राण्यांचा फार मोठा उपद्रव्य भागामध्ये आहे, पण खूप नुकसान होऊनही भरपाई अत्यल्प मिळते.
कुठला भाऊ पंधराशे रुपये टाकतो आणि 270 कोटींच्या जाहिराती करतो?
त्या पुढे म्हणाल्या की, आज कुठेतरी आमच्या महिलांना एक पंधराशे रुपयांचं गुलाबी स्वप्न दाखवणारी एक गुलाबी यात्रा काढली जात आहे.ही लाडकी बहीण योजना नसून, सत्तेसाठी काही पण ही योजना आहे. कुठला भाऊ पंधराशे रुपये टाकतो आणि 270 कोटींच्या जाहिराती करतो. आज दर दोन मिनिटांनी टीव्ही असेल, पेपर असेल, बस स्टॉप असेल, पेट्रोल पंप असेल ओरडून ओरडून सांगा लागलेत की आम्ही आमच्या बहिणीला पंधराशे रुपये दिलेले आहेत. म्हणून माझ्या महिला सुज्ञ आहेत. मी एक महिला आहे मला माहिती आहे की असल्या भूलथापांना या महिला बिलकूल बळी पडणार नाहीत. शंभर रुपयाचा स्टॅम्प बंद करून थेट पाचशेचा केला. कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ 10 हजार स्टॅम्प पेपर महिन्याला विकले जातात. अशा रीतीने फक्त कोल्हापूर जिल्ह्यात दहा कोटींचा फटका बसणार आहे. या खिशातून पैसे काढून घ्यायचे आणि अवघे पंधराशे रुपये तुम्हाला द्यायचे. आज जनतेला शेतीमालाला हमीभाव पाहिजे, जीएसटी नावाचा कर गेला पाहिजे. उद्याची पूर परिस्थिती निर्माण होते त्यासाठी कायमस्वरूपी गाळ काढणे असेल उपाययोजना पाहिजेत. जंगली जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे. आमच्या तरुण-तरुणींना रोजगार हाताला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या