Shinde vs Ajit pawar Faction : सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशा अवस्थेत असलेल्या शिंदे गटाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरु आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटात खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून शीतयुद्ध सुरु असतानाच आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी अदिती तटकरे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. अजित पवार सत्तेत आल्यानतंर गोगावले यांनी भाकरीत वाटेकरी वाढल्याची जाणीव झाली होती. त्यामुळे भारत गोगावले यांना रायगडमधून सुनील तटकरेंच्या रुपाने आव्हान वाढल्याने त्यांची  चलबिचल सुरु झाली आहे. त्याचीच पहिली झलक आज अदिती तटकरेंशी केलेल्या तुलनेवरून दिसून आली. 


काय म्हणाले भारत गोगावले?


आम्ही त्यांच्यापेक्षा (अदिती तटकरे) चांगलं काम करु. महिला आणि पुरुष थोडा फरक तर येतो ना. त्यांच्यापेक्षा मला आमदारकीचा 15 वर्षांचा अनुभव आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सहाच्या सहा आमदार आमची सगळ्यांची एकच मागणी आहे, रायगडचा पालकमंत्री भरतशेठ. 


भरतशेठ तुम्ही नादच केलाय थेट!


त्यांनी केलेल्या कुरघोडीनंतर फुटीर अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून गोगावलेंचा समाचार घेतला. ते ट्विटमध्ये म्हणतात, भरतशेठ तुम्ही नादच केलाय थेट! पालकमंत्री पदासाठी आपले हपापणे आपल्या स्वभावाला साजेसे आहेच, मात्र स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक आहे हे तुमचे उद्गार स्त्रीशक्तीला कमीपणा दाखवणारे आहेत. रायगडच्या मातीचे महत्व तुम्हाला यानिमित्ताने काही दिवसातच कळेल. तथास्तु.. 






पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे


दुसरीकडे, अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही ट्विट करून गोगावलेंचा समाचार घेतला. त्यांनी म्हटले आहे की, आज एका ठिकाणी बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना?? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आले.  राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे. 






भरतजी आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं आपण त्या रायगडमधून येता जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना  'सखी  राज्ञी जयती' असा सन्मान करून अनुपस्थित राज्यकारभार करण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी.आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते.


इतर महत्वाच्या बातम्या