नागपूर : नागपुरातील 8 वर्षांचा चिमुरडा युग चांडकच्या हत्या आणि अपहरण प्रकरणातील दोषींना ठोठावलेली दुहेरी फाशीची शिक्षा नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने, आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना दोषी मानत दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती.




नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही शिक्षा कायम ठेवली आहे. हे दुर्मीळ प्रकरण असून आरोपी बाहेर राहणं समाजासाठी योग्य नसल्याचा निर्वाळा यावेळी कोर्टाने दिला.




कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा?

 

 *लहान मुलाचे अपहरण केल्याने फाशी

*अपहरण करून हत्या - फाशी

*अपहरण-हत्येचा कट - जन्मठेप

*पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न - 7 वर्षांची शिक्षा

*दोन्ही आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा

 

 

न्यायालयाने नोंदवलेलं निरीक्षण

 

* जरी पहिलाच गुन्हा असला, तरी हा गुन्हा अपघाताने नाही. आरोपींनी अत्यंत शांत डोक्याने, विचारपूर्वक केलेलं हे क्रूर कृत्य आहे.

*फक्त वय कमी आहे म्हणून दोषींना मोकळं सोडणे चुकीचं आहे. त्यामुळे या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही.

*दोषींनी 8 वर्षाचा बालक जो स्वसंरक्षण करण्यास असमर्थ होता, अशा युगचं अपहरण केलं. त्यानंतर त्याची हत्या केली. त्यामुळे हा गुन्हा माफ करण्यासारखा अजिबात नाही.

*आरोपींचं कृत्य पाहता, पालक वर्गात भयभीतता आहे. त्यामुळेच आरोपींना जरब बसण्यासाठी दोषींना कठोर शासन आवश्यक आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

 

 

शाळेतून परतलेल्या युगचं अपहरण

 

एक सप्टेंबर 2014 रोजी युगचे संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापरू नगर भागातील गुरु वंदन अपार्टमेंट समोरून अपहरण करण्यात आले होते. युगचे वडील मुकेश चांडक हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. युग शाळेतून परतला आणि आपल्या राहत्या गुरुवंदन अपार्टमेंटमधील वॉचमेनकडेच आपली बेग ठेऊन, लगेच बाहेर धावत गेला.

 

 

इमारतीच्यासमोर एका दुचाकीवर दोघे जण उभे होते. त्यांच्यासोबत युग काही क्षण बोलला आणि त्यानंतर त्यांच्याच सोबत दुचाकीवर बसून निघून गेला. उशिरापर्यंत तो न परतल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले.

 

 

दरम्यान, ज्या पद्धतीने युग शांततेने दोन्ही अपहरणकर्त्यांसह गेला होता, त्याचा विचार करता कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे नागपूर पोलिसांची अनेक पथक नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात युगचा शोध घेत होती.

 

 

चिमुकल्या युगचा मृतदेह

 

 

या घटनेनंतर सर्वत्र नाकेबंदीही करण्यात आली होती, मात्र तरीही युगचा शोध लागू शकला नाही. त्यानंतर 2 सप्टेंबर 2014 रोजी संध्याकाळी नागपूर पासून 25 किलोमीटर अंतरावर लोणखैरी गावाजवळ एका निर्जनस्थळी पुलाच्या खाली पाईपमध्ये युगचा मृतदेह सापडला. अपहरणाची घटना समोर आल्यापासूनच पोलिसांनी अनेक संशयितांना पकडून चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं होतं.

 

 

राजेश डावरे आणि अरविंद सिंग अशी या दोघांची नावं होती. यातील धक्कादायक बाब म्हणजे राजेश हा युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्या रुग्णालयात अकाऊंटटण्ट म्हणून कामाला होता. मात्र त्याने अकाऊंट्समध्ये काही घोळ केल्याने त्याला डॉ. चांडक यांनी कामावरून काढले होते. त्याचा राग मनात ठेवून त्याने युगचे अपहरण केल्याचा आरोप होता.

 

 

राजेशने पैशासाठी किंवा डॉ मुकेश चांडक यांच्यावरील जुन्या रागामुळे 8 वर्षीय युगचे अपहरण करून त्याची हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

 


संबंधित बातम्या


नागपुरात 8 वर्षाच्या चिमुकल्याची अपहरण करून हत्या


चिमुकल्या युगच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा !