जळगाव : शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी दाखल केलेल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांनी देशी दारू पिऊन चांगलाच गोंधळ घातल्याच पाहायला मिळाले. एवढंच नव्हे तर मद्यधुंद अवस्थेत दोघे ही महिला कक्षात घुसले आणि त्या ठिकाणीही गोंधळ घालण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याने तेथील महिला रुग्णांमध्ये भीतीच वातवरण पसरले होते. महिला वॉर्डातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षकांशी देखील त्यांनी हुज्जत घालत अरेरावी केली. काही वेळासाठी कोविड केअर सेंटरमधील यंत्रणेला आणि रुग्णांना चांगलेच हैराण करून सोडल्याच पाहायला मिळालं आहे, या प्रकाराची माहिती मिळताच महापौर भारती सोनवणे आणि त्यांचे पती नगरसेवक कैलास सोनवणे यांनी त्या ठिकाणी धाव घेत दोन्ही रुग्णांची कान उघडणी केली. कोविड रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या या दोघांची रवानगी आता जिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून, याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणन्याच्या हालचाली सुरू आहे.


अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात कोविड केअर व क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. पिंप्राळा उपनगरातील दोन रिक्षाचालक पॉझिटिव्ह अहवाल आल्याने याठिकाणी कुटुंबीयांसह सोमवारी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी रात्री दारू पिऊन गोंधळ घातला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा त्यांनी सेंटरमधून बाहेर जाण्यासाठी सुरक्षारक्षकांशी गोंधळ घातला. सुरक्षारक्षक त्यांना अडवत असताना ते पॉझिटिव्ह असल्याने अंगाला हात लावण्याची धमकी देत बाहेर पडले. या प्रकाराची माहिती सुरक्षारक्षकांनी डॉक्टरांना दिली. त्यानंतर दोघेही रिक्षाने कोविड सेंटरमध्ये परतले. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी आपल्या सोबत देशी दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. दोघे त्यांच्या कक्षात न जाता महिलांच्या कक्षांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे कोविड सेंटरमधील यंत्रणेची धांदल उडाली. दोन्ही कोरोनाबाधित असल्याने सुरक्षारक्षक त्यांना हात लावण्यास घाबरत होते.


महापौरांनी केली कानउघाडणी


दरम्यान, या प्रकाराची माहिती कोविड केअर सेंटरमधून एका रुग्णाने महापौर भारती सोनवणे यांच्याकडे तक्रार केली. महापौर तात्काळ त्या ठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे व शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी देखील त्यांच्यासोबत होते. महापौरांसह नगरसेवकांनी दोन्ही रुग्णांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर दोघेही वठणीवर आले. नंतर ते माफी मागू लागले.


बॅगेतही आढळल्या दारूच्या बाटल्या


सामान्यपणे कोरोना बाधीत रुग्ण उपचारा साठी दाखल होत असताना आपल्या रोजच्या साठी लागणारी खाद्य पदार्थ आणि औषधी सोबत घेत असतात. या महाशयांनी मात्र आपल्या साठी दारूच्या बाटल्यांची सोय करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही रुग्णांच्या बॅगेची झडती केली असता त्यात दारूच्या दोन बाटल्या आढळून आल्या आहेत, महापौरांना त्यांच्या रिक्षा मध्ये बाटल्या लपविल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या बाहेर लावलेल्या रिक्षात तपासणी करायला लावली असता त्यात आणखी दोन दारूच्या बाटल्या मिळून आल्या. मद्यपी रुग्णांचे हे प्रताप पाहून महापौरांनी याबाबत त्याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला या प्रकाराचे चित्रीकरण करायला सांगितले. घडलेल्या प्रकारानंतर या दोघांची तातडीने जिल्हा रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


प्रशासनाचे पितळ उघडे


कोरोनाच्या विविध बाबी मुळे जळगाव ची नकारात्मक ओळख देश भर निर्माण झाली असताना या घटनेमुळे जळगाव जिल्हा प्रशासनाचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. यापूर्वी कोविड रुग्णालयातील एका शौचालयात 10 दिवस बेपत्ता असलेल्या एका 83 वर्षीय वृद्धेचा मृतदेह आढळून आला होता. त्याचप्रमाणे, कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडणे, बाधित मृतांचे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करणे, असे प्रकार घडलेले असताना आता त्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मद्यधुंद अवस्थेतील गोंधळाची भर पडली आहे.


संबंधित बातम्या :