औरंगाबाद : प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. मात्र औरंगाबादमधील एका अल्पवयीन मुलीनं प्रियकरासाठी केलेला गुन्हा तिला चांगलाच महागात पडला आहे. प्रियकराच्या सांगण्यावरुन घरातील दागिने चोरणाऱ्या अल्पवयीन
मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


तरुणीला हा गुन्हा करण्यासाठी भाग पाडणाऱ्या अक्षय वाहूळ नावाच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे. अक्षयनं अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करुन तिला आईचे दागिने आणि पैशांवर डल्ला मारायला सांगितलं. प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलीनं देखील आईचा विचार न करता घरातील दागिने आणि रक्कम चोरली.

भाजी विकून आपल्या एकुलत्या एक मुलीसह उदरनिर्वाह करतात. 17 मार्चला त्यांच्या घरी चोरी झाली. मुलीच्या लग्नासाठी एक-एक रुपया जमा करुन विकत घेतलेल्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचं लक्षात येताच आई हतबल झाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, तेव्हा घराचं कुलूप उघडताना कुठलीही तोडफोड झाली नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. शिवाय ज्या पोटीत सोनं ठेवले होतं, त्याची तेलाच्या किटलीत ठेवलेली चावी चोरट्यांना सहज सापडल्याने पोलिसांची शंका बळावली.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता प्रियकराच्या मदतीने आपण दागिने लांबवल्याची कबुली तरुणीने दिली. आरोपी प्रियकराने यापूर्वीही चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे आपल्या मुलीने चोरी केली आहे, तर तिला शिक्षा व्हायलाच हवी, असा
पवित्रा आईनं काळजावर दगड ठेवत घेतला आणि मुलीविरोधात तक्रार नोंदवली.

या चोरीप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात केली आहे, तर तिचा प्रियकर तुरुंगाची हवा खात आहे.