Maharashtra Amravti News : मंत्री यशोमती ठाकूर याच अचलपूरमधील घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा खळबळजनक दावा अचलपूर प्रकरणी भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला आहे. 12 नोव्हेंबर रोजी अमरावतीत घडलेल्या मुस्लिम मोर्चामध्येही त्यांचाच हात होता, असंही अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे. यशोमती ठाकूर यांचा सहभाग असल्यामुळेच त्या मोर्चामध्ये सहभागी असलेल्या मुस्लिमांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही बोंडे यांनी केला आहे. दरम्यान, आज अचलपूर घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या वतीनं अमरावतीत निदर्शनं करण्यात आली. त्यावेळी भाजप नेते अनिल बोंडे यांनी बोलताना हा दावा केला आहे.
सध्या अचलपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तसेच जमावबंदीचे आदेशही कायम आहेत. याप्रकरणी सध्या भाजप शहराध्यक्षांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
काय झालं होतं अचलपूरमध्ये?
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्यानं तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. पोलिसांनी याप्रकरणी 23 जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अचलपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका पोलिसांंचं आवाहन
दरम्यान याप्रकरणी नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी रात्री विनाकारण बाहेर न निघण्याचं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे. या ठिकाणी दगडफेक झाल्याची माहिती असून पोलिसांनी परिस्थितीवर पूर्णता नियंत्रण मिळविलं होतं. अचलपूर शहरामध्ये सध्या शांतता असून हे प्रकरण आता निवळलं आहे. परतवाडा शहरामध्ये सर्वांनी शांतता ठेवावी, परतवाडा अचल्पुर दोन्ही शहरांमध्ये कलम 144 जमावबंदीचा आदेश लागू झालेले आहेत, कोणीही बाहेर निघू नये निघाल्यास कारवाई करण्यात येईल असं पोलीसांकडून सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :