मुंबई : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या उर्वरीत सर्व परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत म्हणाले की, आज कुलगुरूंसोबत परीक्षासंदर्भात बैठक झाली. तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या. आता उर्वरीत सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असं उदय सामंत म्हणाले.
सामंत म्हणाले की, तेराही अकृषी विद्यांपीठात उद्यापासून ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. टीवायचीही परीक्षा ऑनलाईन असेल, असं उदय सामंत म्हणाले.
ते म्हणाले की, उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. यामुळं परीक्षांचा निकाल लवकर लागेल. राज्यातील 37 लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा आमचा मनोदय आहे, असंही सामंत म्हणाले. हे सर्व विद्यार्थी 18 ते 25 वयोगटातील आहेत.
सामंत म्हणाले की, लॉच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून देणार आहोत. या बैठकीमध्ये प्राध्यापक भरतीबाबतही चर्चा झाली. ही भरती करणार आहोत. फक्त कोविड संकट कमी झाल्यावर होईल, असं सामंत यांनी सांगितलं.
सामंत म्हणाले की, एनसीसी व एनएसएसच्या प्रमुखांशी बोलणार आहे. हे विद्यार्थी लसीकरण मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होतील. संजय ओक यांनी तसं आवाहन केले होते. त्यांच्याशीही मी बोलणार आहे, असं ते म्हणाले.