Uday Samant : महाराष्ट्रातील (Maharashtra) उद्योगांच्या संदर्भात येत्या 15 ते 20 दिवसात श्वेतपत्रिका (White Paper) काढणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी केली. राज्याबाहेर प्रकल्प जात असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत. त्यामुळे श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक महिन्यात श्वेतपत्रिका काढण्याची नोव्हेंबरमध्ये महिन्यातीही घोषणा केली होती. मात्र, एक महिन्यात श्वेतपत्रिका निघाली नाही. त्यानंतर या महिन्यात श्वेतपत्रिका निघण्याची माहिती देण्यात आली आहे. 


प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारवर विरोधकांची टीका


वेदांत-फॉक्सकॉन, एअरबस आणि बल्क ड्रग पार्क आदी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारवर महाविकास आघाडी सरकारने जोरदार टीका केली होती. त्यानंतर हे उद्योग आमच्या काळात राज्याबाहेर गेले नाहीत, असं स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं होतं. तसेच उद्योगांवर श्वेतपत्रिका काढण्याची घोषणाही केली होती.


Rohit Pawar on Govt : श्वेतपत्रिका आधीच काढायला हवी होती  


राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्योगाच्या संदर्भात श्वेतपत्रिका आधीच काढायला हवी होती. नोव्हेंबर महिन्यात श्वेतपत्रिका काढमार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ती काढण्यात आली नसल्याचे रोहित पवार म्हणाले. हिवाळी अधिवेशनात जी आश्वासने दिली होती. ती अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले तरी पूर्ण केली नाहीत. मधल्या काळात सरकारनं काहीही केलं नाही. हे फक्त उद्योगांच्या बाबतीतच होते असे नाही, तर सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत असे होत असल्याचे रोहित पवार म्हणाले.


व्हाईट पेपर म्हणजे काय? 


ज्या-ज्या वेळी एखाद्या मुद्द्यावरुन भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, राजकीय चिखलफेक केली जाते, त्यावेळी त्या विषयाची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली जाते. ही श्वेतपत्रिका म्हणजे एखाद्या विषयाबाबत केंद्र किंवा राज्य सरकारने दिलेली अधिकृत माहिती किंवा निवेदन होय. आपण त्याला शासनाकडून काढण्यात आलेले माहितीपत्रक म्हणू शकतो. 


काय असतं या व्हाईट पेपरमध्ये? 


सरकारने एखाद्या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतली, काय कृती केली त्याची संपूर्ण माहिती या श्वेतपत्रिकेत असते. शासनाची नेमक्या भूमिकेचा आणि कृतीचा अंदाज त्यामधून येतो. श्वेतपत्रिकेत नमूद असलेल्या माहितीचा कोणीही वापर करु शकतो. म्हणजे ती माहिती गोपनीय स्वरुपाची नसते. लोकप्रतिनिधींना आणि नागरिकांना माहिती नसलेल्या गोष्टी त्यांना माहित व्हाव्यात हा उद्देश श्वेतपत्रिका जारी करण्यामागे असतो. ज्यावेळी लोकांमध्ये एखाद्या मुद्द्यावरुन संभ्रम निर्माण होतो, त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला जातो. 


जगातील सर्वात पहिली श्वेतपत्रिका ही ब्रिटनमध्ये काढण्यात आली. इस्त्रायलशी संबंधित बाल्फोर डिक्लरेशनशी संबंधित हा व्हाईट पेपर काढण्यात आला होता. भारतात 1947 साली, काश्मीरवर पाकिस्तानने हल्ला केला होता. त्या विषयावर भारतात सर्वप्रथम श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली होती. 


महत्त्वाच्या बातम्या:


White Paper : व्हाईट पेपर किंवा श्वेतपत्रिका म्हणजे काय? राज्यात आतापर्यंत कोणत्या विषयांवर श्वेतपत्रिका काढण्यात आली?