Maha Vikas Aghadi Meeting : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडाची (Maha Vikas Aghadi) महत्त्वाची बैठक झाली. महाविकास आघाडीच्या डिनर डिप्लोमसीमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विधीमंडळासंदर्भातल्या वक्तव्यावर चर्चा झाली. राऊतांच्या वक्तव्याशी पूर्ण सहमत नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar), नाना पटोले या बैठकीला उपस्थित होते. मविआमध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी काळजी घेण्यासंदर्भात चर्चा झाली. कसबा (Kasaba Election) आणि चिंचवडसंदर्भात (Chinchwad Election) विजय आणि पराभवावर चर्चा झाली. एकत्र लढल्यावर काय होतं? हे आपल्याला दिसलं, बंडखोरी झाली की काय निकाल लागतो ते देखील स्पष्ट झालं आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी महाविकास आघाडी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. 


शरद पवार काय म्हणाले?


संजय राऊत यांच्या वक्तव्याशी मी पूर्ण सहमत नाही. पण त्यावर हक्कभंगाची जी समिती नेमली ती न्यायाला धरुन नाही. ज्यांनी आरोप केले तेच या समितीत असतील तर न्याय कसा होईल, असे वक्तव्य देखील शरद पवारांनी हक्कभंग समितीबाबत बैठकीत केले. एकाधिकारशाही आज लोकांनी नाकारली. विशिष्ट वर्ग आपल्या बाजूने आहे असे समजणाऱ्यांना आज कसबा पोटनिवडणुकीत लोकांनी दाखवून दिले की गृहित धरु नये. लोकांचे महविकास आघाडीवर प्रेम आहे ते आज सिद्ध झाले, असेही शरद पवार म्हणाले. 


उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा


महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. "भाजप ज्यांच्यासोबत राहतात त्यांना संपवून टाकतात. आपण तिन्ही पक्ष एकत्र असलो तर कसब्यासारखे भाजपचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त करु. लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांनी एकत्र लढले पाहिजे. जागा वाटपाबाबत काही तडजोडी कराव्या लागल्या तरी कराव्यात, नाहीतर 2024 लोकसभा शेवटची निवडणूक असेल. जे निकाल आले ते हवे असेल तर सगळ्यांनी एकत्र लढले पाहिजे. मी काही पाप केलेलं नाही, काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाऊन चुकीचे केलं नाही. माझ्याच लोकांनी मला धोका दिला पण या दोन्ही पक्षांनी साथ दिली. भाजप ही कीड आहे ज्यांच्यासोबत राहतात त्यांना संपवून टाकतात. आपण तिन्ही पक्ष एकत्र राहिलो तर कसबासारखे यांचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त करू शकतो," असे उद्धव ठाकरे म्हणाले. 


विधिमंडळाच्या अधिवेशनाचा (Assembly Budget Session) आज पाचवा दिवस आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उत्तर देणार आहेत.


संबंधित बातमी :