Yashwantrao Chavan Birth Anniversary : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे. एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून यशवंतराव चव्हाण यांना ओळखले जाते. यशवंतराव चव्हाण यांचं कृषी, उद्योग, सहकार, शिक्षण, पंचायतराज, सांस्कृतीक क्षेत्रात मोठं योगदान आहे. येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असा पाया यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला.


यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च, 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. त्यांचे वडील यशवंतराव लहान असतानाच वारले. त्यांच्या आई विठाबाई, त्यांचे बंधू ज्ञानदेव यांनी कष्ट करुन घर चालवले. यशवंतराव या पुत्राने खूप शिकावे अशी त्यांच्या आईची इच्छा होती. यशवंतरावांनी शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. त्यांनी संगीत, भजन-कीर्तन यामध्येही त्यांनी सहभाग घेतला.  कराड येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, लोकमान्य टिळक, ना. गोखले यांची भाषणे त्यांनी ऐकली. त्यांनी सालसेत असताना सत्याग्रहात भाग घेतला म्हणून त्यांना अठरा महिन्यांची शिक्षा देखील झाली होती.




यशवंतराव चव्हाण यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एबीपी माझा डिजिटलने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला. सोलापूर जिल्ह्यातील उजणी धारणाचे भूमिपूजन करताना यशवंतराव चव्हाण यांनी जे भाषण केलं होतं, त्याची आठवण यावेळी उल्हासदादा पवार यांनी सांगितली. एखाद्या कवीपेक्षा श्रेष्ठ अश्या प्रकारचे भाषण त्यांनी केले. चंद्रभागा नदीवर हे धरण बांधण्यात येणार होतं. चंद्रभागा नदीचे पाणी हे नेहमी वाहतं होतं. मात्र, धरणाच्या कामामुळं हे वाहतं पाणी अडवलं जाणार होतं. पांडुरंगाची चंद्रभागा अडवून धरणं बांधायचं होतं. यावेळी यशवंतराव म्हणाले की, पांडुरंगा मी तुझी चंद्रभागा अडवतोय, पण तू रागवू नको, कारण तुझे जे भक्त आहेत ते शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांचे मळे फुलावे, फळा फुलांनी त्याचं रान फुलावं, शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी पाण्याची गरज आहे. त्यामुळे पांडुरंगा तुझी क्षमा मागून मी धरणाच्या कामाचे पुजन करत आहे. 'या धरणाच्या पाण्यातून ज्वारीच्या कणसाच्या दाण्या दाण्यातून' शेतकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन होईल' असे विचार यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी मांडल्याचे उल्हासदादा पवार यांनी सांगितलं.




तसेच उल्हासदादा यांनी दुसरी एक यशवंतराव चव्हाण यांची दुसरी एक आठवण सांगितली. यशवंतराव चव्हाण यांनी एक दिवाळी अंक लिहला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आईबद्दलची आठवण सांगितली आहे. ज्यावेळी मी लहान होतो, त्यावेळी आई पंढरपूरच्या वारीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी घेऊन जात असे. पंढरपूरमध्ये आम्ही पोहोचलो की आई म्हणायची यशवंता गर्दी खूप आहे माझ्या हाताचं बोट सोडू नको. नाहीत गर्दीमध्ये चुकशील. म्हणून मी देवळात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत आईचे धरललं बोट सोडत नसे. याचा संदर्भ देताना त्यांनी सामाजिक संस्कार कसे झाले याचा दाखला दिला आहे. पंढरपूरला जाताना आणि पंढरपूरवरुन येताना आई बोट सोडून नको म्हणायची याचा अर्थ असा होतो की, भागवत सांप्रदाय हा उदात्त मानवतावादी आहे. प्रत्येक मानवात ईश्वर आहे. या सांप्रदायाचा विचार तू सोडू नको असंच माझ्या आईला मला यातून सांगायचं होतं असं यशवंतराव यांनी सांगितलं. म्हणून मी माझ्या आईचं बोट सोडलं नाही. यशवंतरावांचे कृषी, औद्योगिक, सहकार, शिक्षण या क्षेत्रात मोठं योगदान असल्याचं उल्हासदादा पवार यांनी सांगितले.