Minister Nitesh Rane : सध्या कांदा उत्पादक शेतकरी (onion Farmers) संकटात सापडला आहे. कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं विविध संघटनांसह शेतकरी (Farmers) आक्रमक होताना दिसत आहेत. अशातच आज नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane) हे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात आले होते. यावेळी एका शेतकऱ्याने भर सभेत बोलत असताना नितेश राणे यांनी कांद्याची माळ घातल्याचा प्रकार घडला. यानंतर पोलिसांनी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतलं आहे.


नेमकं काय घडलं?


मंत्री नितेश राणे हे सभेत बोलत होते. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्याने त्यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली आहे.  यानंतर शेतकरी माईकवर बोलत होतो. त्यावेळीच पोलिसांनी या कांदा उत्पादक शेतकऱ्याला ताब्यात घेतलं आहे. मंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्याला थांबवा त्याच्या समस्या ऐकून घेऊ असे सांगितलं. शेतकऱ्याने माईकवर बोलण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शेतकऱ्याला  ताब्यात घेतलं. या शेतकऱ्याला माईकवर बोलू दिलं नाही. 


कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत, दरात मोठी घसरण


सध्या कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.  कारण कांद्याचे दर अचानक घसरत आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण सुरुच आहेत. गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे. तर जास्तीत जास्त दर हा 2 हजार 800 रुपये मिळत आहे. 


कांद्याची आवक व  कांदा निर्यातीत येणारे अडथळे यामुळे कांद्याचे भाव घसरले


गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरात चांगलीच वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं.  सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही कांद्याने आपला भाव कायम ठेवली होती. कांद्याचे दर हे 5000 ते 6000 प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचले होते.  मात्र, सध्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सरकारी यंत्रणांमार्फत कांद्याची खुलेआम विक्री होत असली तरी त्याचा पुरवठा पुरेसा होत नाही. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून सातत्याने किरकोळ दर 60 ते 80 रुपये प्रतिकिलो होते. मात्र, सध्या कांदा 2000 प्रतिक्विंटल ते 2500 रुपयांच्या आसपास विकत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.  देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवक व  कांदा निर्यातीत येणारे अडथळे यामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत. कांदा निर्यातशुल्क तातडीने मागे घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


महत्वाच्या बातम्या:


कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?