ठाणे : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू (Cricket) आणि 1990 च्या दशकातील स्टार फलंदाज विनोद कांबळी सध्या आर्थिक विवंचनेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर, पुन्हा एकदा विनोद कांबळीच्या आजाराची व आर्थिक परिस्थितीची सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली. त्यावेळी, विनोद कांबळीने (Vinod Kambli) गायलेलं गाणंही तुफान व्हाययरल झालं होतं. आता, पुन्हा एकदा विनोद कांबळीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. विनोद कांबळी यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे भिवंडीतील काल्हेर येथील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी (Doctor) सांगितले आहे. दरम्यान, येथील रुग्णालयात एबीपी माझाच्या प्रतिनिधींशी बोलतान विनोद कांबळीने पुन्हा एकदा गाणं गायलं अन् सर्वांनाच भावूक करुन टाकलं.
आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर हे बालपणापासून क्रिकेटचे चाहते असून त्यांनी विनोद कांबळी यांचे अनेक सामने पाहिले आहेत. सोशल मीडियावर कांबळींच्या प्रकृती अस्वस्थतेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी भावनिक होत त्यांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तत्काळ कांबळी यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. “विनोद कांबळी हे भारतासाठी योगदान देणारे महान खेळाडू आहेत. त्यांना मदतीची गरज असल्याचे पाहून मी त्यांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य मानले,” असे शैलेश ठाकूर म्हणाले. दरम्यान, विनोद कांबळी यांनी चाहत्यांना संदेश देत सांगितले, “माझी प्रकृती सुधारत आहे. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे मला बळ मिळाले आहे.”. यावेळी त्यांनी गाणंही म्हटलं.
मी एवढंच सांगेन,
कल खेल मे हम हो नं हो
गर्दीश मे तारे रहेंगे यहाँ
भुलो गे तुम, भुलेंगे हम
पर हम तुम्हारे रहेंग सदा
रहेंग यदी अपने निशा
जिसके सिवाँ जाना कहाँ...
मेरा नाम जोकर या चित्रपटातील गाण्याचे हे बोल विनोद कांबळीने गायले आणि डॉक्टरांसह रुग्णालयात उपस्थित सर्वच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
विनोद कांबळीला नेमकं काय झालंय?
न्यूट्रेशनल आणि युरिनरी प्रॉब्लेम आहे. विनोद कांबळी यांना लघवीचा त्रास वाढला असून मसल्स क्रॅम आहे. मसल्स क्रॅम असल्याने ते बसूही शकत नाहीत. त्यामुळे, आम्ही त्यांना तत्काळ रुग्णालयात आणून उपचारासाठी दाखल केले आहे. युरीन इन्फेक्शनचा प्रॉब्लम असून त्यांवरील उपचारपद्धती सुरू आहे. तसेच, न्युरोलॉजी, युरोलॉजी व आर्थोपिडीक तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची काळजी घेतली जात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे डॉक्टरांनी म्हटलं.
विनोद कांबळींच्या उपचाराची जबाबदारी
आम्ही सर्वांनी संकल्प केला असून विनोद कांबळी यांच्यासाठी लाईफटाईम त्यांच्यावरील सर्वच उपचार मोफत करणार असल्याचे रुग्णालयातील प्रमुखांनी म्हटलं आहे. आम्ही त्यांचं क्रिकेट पाहूनच लहानाचे मोठे झालो आहोत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. सध्या तीन डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे. क्रिकेटप्रेमींनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शैलेश ठाकूर यांचा दयाळूपणा आणि माजी खेळाडूबद्दलची आस्था यामुळे भिवंडीत क्रिकेटप्रेमींच्या मनात त्यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.