Dhananjay Munde Case : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी या अधिकाऱ्यानं देखील रेणू शर्मावर असाच आरोप केला आहे.
... तर माझाही धनंजय मुंडे झाला असता - मनसे नेते मनीष धुरी कृष्णा हेगडे यांच्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनीही ही महिला फोन व मेसेजद्वारे रिलेशनशिपसाठी गळ घालत होती, असं म्हटलंय. परंतु त्यांनी यातून कशीबशी सुटका करून घेतली असल्याचे स्वतः मनीष धुरी यांनी सांगितलं असून, याबाबत तेही पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत. धुरी यांनी म्हटलंय की, 2008-09 च्या काळात माझाही धनंजय मुंडे झाला असता. त्या वेळी रेणू शर्मानं माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ अल्बम करायचा म्हणून तिने मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. महिला होती आणि पक्ष नवीन होता म्हणून मी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. तिचा उद्देश चांगल्या लोकांना फसवणे हाच उद्योग असल्याचं माझ्या लक्षात आलं. मला ती एकदा बहिण आहे असं सांगून एका खोलीत घेऊन गेली. मात्र मला ती काहीतरी चूक करेल असं लक्षात येताच स्वत:ला सोडवून घेतलं. त्यानंतर मी तिचा संपर्क तोडला. आता हेगडेंनी तक्रार केली आहे तर मी ही याबाबत तक्रार करणार आहे, असं धुरी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
हा हनी ट्रॅपचा प्रकार- भाजप नेते कृष्णा हेगडे कृष्णा हेगडे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, 2010 पासून रेणू शर्मा ही महिला मला त्रास देत होती. ती मला फोर्स करत होती की मी तिच्याबरोबर संबंध ठेवावे. मी तिला दुर्लक्षित करत होतो. तरीही ती वेगवेगळ्या नंबरवरुन मला फोन करायची मेसेज करत होती. मी तिच्याबद्दल माहिती काढल्यानंतर हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे समजले. आता 6 जानेवारीला मला तिनं पुन्हा मेसेज केले. त्यानंतर मला धनंजय मुंडेचं प्रकरण समजलं. इतक्या वर्षानंतर हे प्रकरण बाहेर आणलं. आज मुंडेंचं प्रकरण बाहेर आलं. उद्या मला फसवलं असतं परवा अजून कुणाला फसवलं असतं. म्हणून मी तक्रार द्यायला पोलिसात जात आहे. मी पोलिसांना माहिती दिली आहे. धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत पण ही महिला कुणालाही टार्गेट करु शकते, असं हेगडे म्हणाले. हेगडे म्हणाले की, मला माहिती मिळाली की ती दुसऱ्यांना देखील फसवत होती. आता माझ्या तक्रारीनंतर अजून लोकं बाहेर येऊन तक्रार करतील. माझा तिच्याशी काही संबंध नाही. जर माझा संबंध नाही तर कुण्या महिलेचं नाव का खराब करायचं म्हणून मी बोललो नाही. तिला म्युझिक स्टुडिओ काढायचा आहे, त्यासाठी पैसे हवेत. आता धनंजय मुंडेंना टार्गेट केलं आहे. मला आता त्यांना टार्गेट केलेलं दिसलं त्यामुळं मी आता बोललो. मुंडे यांना फसवलं जात असल्याचा आरोप देखील कृष्णा हेगडे यांनी केला. हेगडे म्हणाले की, मी 2010 मध्ये या महिलेची माहिती काढली. मला मिळालेल्या माहितीमुळं मी तिला दुर्लक्षित केलं. मला तिनं सतत संपर्क करण्याचा प्रयत्न केला, असं ते म्हणाले.
जेट एअरवेजमधील अधिकाऱ्याचाही आरोप
रेणू शर्मा या महिलेने मे 2018 ते जुलै 2019 दरम्यान सोशल मीडियावरून मैत्री झालेल्या जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी नामक अधिकाऱ्याला देखील अशाच प्रकारे छळले असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिझवान यांच्यासोबत आधी मैत्री मग हॉटेलिंग आणि बरेच काही अनेक दिवस घडले त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर सदर महिलेने रिझवान यांच्या विरुद्ध विनय भंग करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसात दाखल केली.
Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार