मुंबई : सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे. यानंतर त्यांच्यावर भाजपकडून टीकेची झोड उठली आहे. सोबतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.


मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही- चंद्रकांत पाटलांची पोस्ट
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भाजपच्या महिला शाखेच्या वतीनं एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. आम्ही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर असे आरोप होतात त्याला त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो. मात्र गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करुन धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.


Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! आमदारकी धोक्यात? कायदा काय सांगतो?


नैतिकता महत्वाची - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये बोलताना म्हटलं आहे की, धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली दिली आहे. त्यांच्या पक्षानं तातडीनं दखल घ्यावी. नैतिकता महत्वाची आहे. चौकशी करून काय बाहेर येतं ते बघावं. आम्ही त्यानंतर पुढची मागणी करणार आहोत, असं ते म्हणाले.


निवडणूक आयोगाकडे तक्रार
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: कबूल केलं आहे की, त्यांनी दोन लग्न केली आहेत. अनेक मुलं आहेत. तसंच तिसऱ्या महिलेशीही त्यांचे संबंध आहेत. त्यांनी हे देखील सांगितलं आहे की, त्यांनी पत्नी आणि मुलांच्या नावे अनेक प्रॉपर्टी घेतल्या आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात हे काही दिसत नाही, म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे या सर्व गोष्टींचा तपास व्हायला हवा, अशी तक्रार केली आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.