शिर्डी : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आज पासून आठवड्यातील तीन दिवस ऑनलाईन पास बंधनकारक केल्याने साईभक्तांना मोठ्या त्रासाला सोमोरे जावं लागत आहे. देशभरातून आलेल्या साईभक्तांना तासभर पास घेण्याच्या रांगेत उभं रहावं लागतंय. गुरुवार, शनिवार आणि रविवारी शिर्डीत साईमंदिर परीसरात असलेले ऑफलाईन पास वितरण बंद ठेवण्याचा निर्णय साईसंस्थानने घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे साईभक्तांचे मोठे हाल होत आहेत.


गर्दीचे दिवस असलेल्या शनिवार, रविवार आणि गुरूवारच्या दिवशी फक्त ऑनलाइन पास धारकांनाच साई दर्शन देण्याचा संस्थानने घेतलेला निर्णय हा भक्तांसाठी डोकेदुखी ठरला आहे. आज अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी शिर्डीत मोठा गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. ऑफलाईन पास वितरण बंद केल्याने दर्शन व्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसत आहे. ऑफलाईन पास काउंटर समोर भाविकांच्या मोठ्या रांगा असून सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडालेला आहे.


मकर संक्रांतीचा दिवस साईदर्शनाने गोड करण्याची इच्छा असलेल्या साईभक्तांचा हिरमोड झाला आहे. पूर्वी प्रमाणे दर्शनव्यवस्था करण्याची मागणी साईभक्त करत आहेत.


वाढती गर्दी पाहून संस्थान वेळोवेळी ऑफलाईन पास सुरू करत होते तर गर्दी वाढली की बंद यामुळे भक्तांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागले. भक्तांनी ऑनलाईन पास घेऊनच शिर्डीत यावं म्हणजे गैरसोय होणार नाही हे नक्की.