Bachhu Kadu : आज गुढीपाडवा आहे. राज्यात सर्वत्र उत्साहात हा सण साजरा केला जात आहे. कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षात गुढीपाडवा साजरा करण्यात आला नव्हता. यावर्षी मात्र, कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळं मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. दरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी एक संकल्प केला आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या 60 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा संकल्प गुढीपाडव्यानिमित्त बच्चू कडू यांनी केला आहे.


श्रमदानाची गुढी


पुढील एक वर्षाच्या काळात अचलपूर विधानसभा मतदारसंघातील शाळांचा पुणे येथील वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर विकास करण्यात येणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. या उपक्रमाची सुरुवात बच्चू कडू यांच्या बेलोरा गावातील जिल्हा परिषद शाळेपासून करण्यात आली आहे. आज गुढी पाडव्याच्या निमित्तानं गावातील शाळेची स्वच्छता करुन लोकसहभागातून गुढी उभारण्यात आली. शाळेतील शिक्षकांसह स्वयंसेवकांच्या माध्यमातून विविध तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय भाषा, संगणक साक्षरता इत्यादी प्रकारच्या भविष्यवेधी शिक्षणाची संधी मुलांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच येणाऱ्या काळात मराठी, हिंदी या भाषांसोबतच स्पोकन इंग्लिश, जापनीज या अंतरराष्ट्रीय भाषांवर विद्यार्थ्यांनी प्रभुत्व मिळविवावे यासाठी देखील प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.


दरम्यान, गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मागील दोन वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साडरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. घरोघरी गुढी उभारुन नववर्षाची सुरुवात केली जाते. खरेदी करता बाजारातही मोठी लगबग पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात. मुंबई आणि पुण्यातील शोभायात्रांची शान काही वेगळीच असते.


महत्त्वाच्या बातम्या: