PM Modi Gudi Padwa Wishes : : गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मागील दोन वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साजरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सर्व स्तरांतून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. राजकीय नेतेमंडळींनीही नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी बांधवांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी खास मराठीतून ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचे जावो अशी मी प्रार्थना करतो. आगामी वर्षात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
मराठी नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठी नववर्ष प्रारंभ आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे एका बिकट परिस्थितीवर मात करू शकलो आहोत. निर्बंधातून मुक्त होऊ शकलो. हीच सज्जता, सतर्कता यापुढेही ठेवूया. अशा अनेक आव्हानांवर मात करण्याची ताकद, हिंमत अंगी बाणवूया. त्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
कोरोनामुक्तीची पहाट आनंददायी, उत्साह वाढवणारी- अजित पवार
कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊदे, महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गुढी अशीच उंच उंच जाऊदे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्तानं साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण यंदा कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आला आहे. दोन वर्षांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईनंतर उगवलेली कोरोनामुक्तीची पहाट आनंददायी, उत्साह वाढवणारी आहे. कोरोनाचं संकट संपण्याच्या मार्गावर असून मुख्यमंत्री महोदयांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध हटवून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याची अनोखी भेट दिली आहे. कोरोनाकाळात अवलंबलेली स्वच्छता, सुरक्षिततेची सवय वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात यापुढेही कायम ठेवूया... निरोगी, बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान देऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha