Students Protest for online exam : कोरोना महामारीचा संसर्ग कमी होत असून बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागानं कळवलं, पण त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणचे विद्यार्थी आक्रमक होत थेट रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षा ऑफलाईन घेऊ नये, अशी मुख्य मागणी यावेळी विद्यार्थी करत आहेत. दरम्यान राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना काही विद्यार्थी रस्त्यावर आले म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं मत असं नाही तसंच यात काही चूकीचे लोकही असतील असं मतही त्यांनी दिलं आहे. तसंच या सर्वाची चौकशी केली जाईल आणि आंदोलनातील मागण्यांवर चर्चाही केली जाईल असं कडू यांनी म्हटलं आहे. या आंदोलनातील मागण्यांवर चर्चा केली जाईल. तसंच परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन हे ठरवण्यासाठी कोणालाही सल्ला द्यायची गरज नाही. हे निर्णय घेण्यासाठी शिक्षणविभाग परिपूर्ण असल्यांचही बच्चू कडू म्हणाले. 


'विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही'


या आंदोलनात शिक्षणाशी काहीही संबंध नसणारी काही चुकीची माणसं असल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. तसंच या सर्वाच्या मागे कोण आहे याचा शोध घेऊ आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची योग्य चौकशी करु, त्यांच्या शालेय जीवनावर कोणताही दुष्पपरिणाम होऊ देणार नाही. तशा सूचना पोलिसांना देऊ असंही कडू म्हणाले आहेत.


राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर


राज्यात अनेत ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि उस्मानाबादमध्ये काही विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे कुणाचं नेतृत्त्व आहे?  या विद्यार्थ्यांना कोण भडकवतंय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान ऑफलाईन परीक्षेला विरोध करण्यासाठी मुलं रस्त्यावर उतरली असताना कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता सरकार या दबावाला बळी पडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.  दहावी बारावी बोर्ड परीक्षा एक महिनाभर आलेली असताना दहावी बारावी बोर्ड परीक्षा नेमकी वेळापत्रकानुसार होणार की लांबणीवर जाणार? याबाबत सध्यातरी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने वेळापत्रकानुसारच होईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलय. मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत या निर्णयाबाबत वेट अन्ड वॉचची भूमिका असून दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलायचा की नाही?  ते त्या वेळच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवलं जाईल, असाही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलाय. तर  दुसरीकडे दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात याव्यात अशा प्रकारचा प्रस्ताव शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समोर ठेवला आहे. त्यामध्ये दहावी बारावी बोर्ड परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पालकांनीसुद्धा परीक्षा संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. 



हे ही वाचा-