मुंबई : राज्यपाल नामनियुक्त विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. विदर्भातील गायक अनिरुद्ध वनकर आणि मुझफ्फर हुसेन यांच्या नावावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे. अनिरुद्ध वनकर यांच्या नावावरुन विदर्भातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे. तर मुझफर हुसेन यांच्या उमेदवारीवरून मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी आहे. विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने काँग्रेसचे नेते नसीम खान नाराज असल्याची चर्चा आहे. या आधी मुझफ्फर हुसेन यांना दोन वेळा विधान परिषदेवर पक्षाने संधी दिली होती. पुन्हा त्यांनाच संधी दिल्याने नाराजी असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेसाठी 'या' 12 जणांना संधी, जाणून घ्या त्यांच्याविषयी
मीरा भायंदर क्षेत्रात काम केलेल्या आणि आधीही विधानपरिषदेत निवडून गेलेल्या मुझफ्फर हुसेन यांना काँग्रेसनं संधी दिली आहे. 1991 ला मीरा भाईंदर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मीरा भाईंदर महापालिकेचे उपमहापौर पदावर देखील त्यांनी काम केलं आहे. याआधी दोन वेळा विधान परिषदेत ही आमदार म्हणून निवडून गेले होते. व्यावसायिक असलेल्या हुसेन यांचं मीरा भाईंदर परिसरासह मुंबईत अनेक ठिकाणी चांगला संपर्क आहे. त्यांचा नावावर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी आहे. हुसेन यांना आधी दोन वेळा विधान परिषदेवर पक्षाने संधी दिली होती. पुन्हा त्यांनाच संधी दिल्याने नाराजी असल्याची माहिती आहे.
आंबेडकरी चळवळीतलं खासकरुन विदर्भातील एक चर्चित नाव अनिरुद्ध वनकर. बाबासाहेबांच्या चळवळीला आपल्या वाणीने पुढे नेणारा एक कलांवत अशी त्यांची ओळख आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून अनिरूध्द यांनी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून दोनदा निवडणूक लढवली व लक्षणीय मतं घेतली होती. 2014 साली चंद्रपूर विधानसभा त्यांनी लढवली यावेळी त्यांनी 14 हजारांच्यावर मतं घेतली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी 15 हजार मतं घेतली होती. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या कार्यक्रमातून अनेकदा भाजपसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका केली आहे. आता कॉंग्रेसनं त्यांना संधी दिल्यानं विदर्भातील काँग्रेस नेते नाराज असल्याची माहिती आहे.