मुंबई: राज्यातील लाडक्या बहि‍णींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यात महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हफ्ता म्हणून 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे स्क्रीनशॉट शेअर केले असून काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. त्यानंतर, आता स्वत: महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  योजनेचा  लाभ देण्यासाठी  बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे, असे त्यांनी म्हटले. आदिती तटकरे यांनी मंत्रालयातील दालनातून ओटीपी टाकून महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. 


राज्यात  आतापर्यत 1 कोटी 6 लाख 40 हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास 1 कोटी 36 लाख पात्र महिला आहेत. अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे. या योजने अंतर्गत अधिकाधिक माता-भगिनी पर्यंत सन्माननिधी वितरित करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे, असे आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, ज्या महिला भगिनींच्या बँक खात्यात आज रक्कम जमा झाली नसेल, त्यांना पुढील दोन दिवसांत बँक खात्यात या योजनेची रक्कम जमा होऊन लाभ मिळेल. 


भंडाऱ्यात महिलांच्या बँक खात्यात आले पैसे


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची तीन हजार रुपयांची रक्कम आज भंडारा जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यावर जमा झाल्या आहेत. तर अनेक महिलांचे खाते अजूनही अपडेट व्हायचं असल्यानं त्यांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायची आहे. रक्षाबंधनापूर्वी खात्यावर तीन हजार रुपये जमा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिलं होतं. त्या अनुषंगानं आज महिलांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्यानं महिलांनी आनंद व्यक्त केला आहे.




जालन्यातही रक्कम जमा


रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यावर  दोन हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जालन्यात देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान लाडकी बहिण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाल्याने मला आनंद झाला असून ही योजना प्रशासनाने यापुढेही चालू ठेवावी, असे देखील महिलांनी म्हटले आहे. जालना येथील काही महिला बांधवांनी माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. तसेच, राज्य सरकारचे आभारही मानले आहेत. 


सिंधुदुर्गातही आले 3000


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाले असून त्यांनी आपले स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. तसेच, मोबाईल हाती धरुन हे मेसेज दाखवत मुख्यमंत्र्‍यांचे आभार मानले आहेत. सिंधुदुर्गासह जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला भगिनींना देखील पैसे मिळाले असून त्यांच्या बँक खात्याचे स्कीनशॉट समोर आले आहेत.