Milk Price : खासगी आणि सहकारी दूध संघांनी संगनमत करुन 3.5/8.5 गुणवत्तेच्या  दुधाला 34 रुपये दर (Milk Price) जाहीर केले. मात्र, फॅट आणि एस.एन.एफ.चे रिव्हर्स दर वाढवून शेतकऱ्यांना त्यापेक्षाही कमी दर मिळतील अशी व्यवस्था दूध संघानी केली आहे. सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करुन रिव्हर्स रेट पूर्ववत करावेत आणि शेतकऱ्यांना किमान 35 रुपये दर मिळतील याची व्यवस्था करावी अशी मागणी किसान सभेनं केली आहे. मात्र, याबाबत दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मौन बाळगून आहेत. त्यामुळं सरकार आणि दुग्ध विकासमंत्री यांची शेतकऱ्यांची लुट सुरु ठेवण्यासाठीची मूक संमती आहे काय ? असा सवालही किसान सभेनं केलाय.  


गायीच्या दुधाला प्रति लिटर किमान 35 रुपये दर द्यावा या मागणीसाठी किसान सभा, दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, राज्यातील विविध शेतकरी संघटना व शेतकरी नेत्यांनी संघर्ष केला. त्याचा परिणाम म्हणून राज्य सरकारने हस्तक्षेप करत दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा असे निर्देश दिले. मात्र सरकारच्या अशा हस्तक्षेपाचा पूर्वानुभव पाहता असे निर्देश, पळवाटा काढून धाब्यावर बसविले जातील, अशीच शंका होती. प्रत्यक्षात तसेच घडल्याचे मत किसान सभेचे नेते अजित नवले म्हणाले.  


रिव्हर्स रेट वाढवण्यात आल्याने दुध व्यवसाय तोट्यात 


शेतकऱ्यांना दूध संघांनी आणि दूध कंपन्यांनी गायीच्या दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा यासाठी शासन आदेश काढण्यापूर्वी फॅटचा रिव्हर्स रेट प्रति कमी होणाऱ्या 1 पॅाइंटसाठी 20 पैसे होता. आता तो सरळ 50 पैसे  करण्यात आला आहे.  एस.एन.एफ.चा रिव्हर्स रेट प्रति कमी होणाऱ्या 1 पॅाइंटसाठी 30 पैसे होता, आता तो 1 रुपया करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना यामुळे फक्त 25 ते 30 रुपयांचा दर मिळत आहेत. महाराष्ट्रात पशुधनाचे संकरीकरण करताना वापरण्यात आलेल्या पद्धती आणि बिजामुळे बहुतांश संकरीत गायींच्या दुधाला कमी फॅट आणि एस.एन.एफ. बसते. शिवाय सध्या पावसाळा असल्यानं आणि हिरवा चारा उपलब्ध असल्यानेही दुधाचे फॅट आणि एस.एन.एफ. कमी झाले आहे. परिणामी रिव्हर्स रेट वाढवण्यात आल्याने दुध व्यवसाय तोट्यात गेला आहे. रिव्हर्स पॅाइंटमुळे दूध उत्पादकांना प्रतिलिटर आठ ते नऊ रुपयांची तूट सोसावा लागत असल्याचे नवले म्हणाले. 


सरकारनं पशुखाद्याचे दर कमी करण्यासाठी पावले उचलावीत


सरकारने दूध दर वाढवण्यासोबतच पशुखाद्याचे दर 25 टक्क्यांनी कमी करण्याचे आदेश दिले होते. प्रत्यक्षात मात्र हे दर कमी करण्याऐवजी 1 ऑगस्टपासून पाच टक्क्यांनी वाढले आहेत. शासनाने दूध उत्पादकांच्या या प्रश्नांची तातडीने दखल द्यावी. गायीच्या दुधाला 34 रुपये दर देत असताना रिव्हर्स रेट पूर्ववत करत फॅट रिव्हर्स रेट 20 पैसे व एस.एन.एफ. रिव्हर्स रेट 30 पैसे करावेत. तसेच पशुखाद्याचे दर कमी करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी किसानसभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Raju Shetti : पांढऱ्या दुधातल्या काळ्या बोक्यांची ईडीकडून चौकशी करावी, राजू शेट्टींचा प्रहार