Milk Price : सध्या राज्यातील दूध उत्पादक शेतकरी (Milk Farmers) चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कारण दुधाच्या दरात (Milk Price) मोठी घसरण झाली आहे. यामुळं राज्यातील शेतकऱ्यांसह विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. किसान सभेनं देखील सरकारवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, दुधाला 34 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी, गेल्या 4 दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे आमरण उपोषणास बसले आहेत. मात्र, सरकारचं याकडं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी केलाय.


 सरकारचा आदेश पाळण्यास सहकारी आणि खासगी दूध संघांचा नकार 


सरकारने 4 दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळ संदीप दराडे आणि अंकुश शेटे यांनी सुरू केलेल्या उपोषणात  बेमुदत अन्नत्याग करत डॉ. अजित नवले यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. दुधाचे दर कोसळल्याने महाराष्ट्रभरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने आदेश देऊनही सहकारी आणि खासगी दूध संघांनी हा आदेश पाळण्यास दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत नकार दिला आहे.


प्रश्न सोडवल्याशिवाय उपोषण सोडणार नाही


अकोले येथे सुरू असलेल्या उपोषणास राज्यभरातून पाठिंबा मिळत असून सरकारने तातडीने या प्रश्नात ठोस तोडगा काढावा असे आवाहन दूध उत्पादकांनी केले आहे. उपोषणास  शेकडो ग्रामपंचायती आणि दूध संकलन केंद्रांनी ठराव करून पाठिंबा दिला आहे. आंदोलनस्थळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते, आजी, माजी आमदार आणि खासदार यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. दुधाला 34 रुपये भाव जोवर मिळत नाही आणि दुध भेसळ, वजन आणि मिल्कोमीटर काटमारी, खासगी संस्थांना लागू असणारा कायदा आदी प्रश्नी कार्यवाही केल्या शिवाय उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्त्यांनी जाहीर केले आहे. 


संगनमत करून दुधाचे भाव पाडले


राज्यात दुध संघ आणि कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाच्या चढ उतारामुळं निर्माण होणारी अस्थिरता संपवण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. खासगी आणि सहकारी दूध संघांचे दुध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने दर तीन महिन्याने दुध खरेदीदर ठरवावेत. दुध संघांनी आणि  कंपन्यांनी यानुसार दर द्यावेत असे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले होते. यानुसार दुधाला 34 रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र, या दरात रिव्हर्स दराची मेख मारुन दुध कंपन्यांनी त्यावेळी दर पाडले. आता तर हा आदेशच धाब्यावर बसवण्यात आला आहे. 34 रुपयांऐवजी बेस रेट 27 रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला असल्याचे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले म्हणाले.  


महत्त्वाच्या बातम्या:


दुधाच्या दरात घसरण! किसान सभा आक्रमक, राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये शासनाच्या 'त्या' आदेशाची होळी