हिंगोली : हिंगोलीमध्ये (Hingoli) ओबीसी सभेचं (Obc Sabha) आयोजन करण्यात आलंय. या सभेला छगन भुजबळांसह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. 'छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडेंनी पक्ष काढला असता तर मी इथे मुख्यमंत्री म्हणून आले असतो', असं वक्तव्य महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केलं. दरम्यान या ओबीसीमधून अनेक मुद्द्यावर भाष्य महादेव जानकरांनी केलं.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा देखील केला. तर, 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावणार असल्याचं सरकारने म्हटले असल्याचा दावा देखील जरांगे यांच्याकडून केला जात आहे. परंतु, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून सरसकट आरक्षण देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांचा विरोध होत आहे. त्यामुळे हा विरोध दाखवण्यासाठी रविवार 26 नोव्हेंबर रोजी हिंगोलीत भव्य ओबीसी सभा आयोजित करण्यात आलं.
भुजबळांसोबत युती करण्यास आम्ही तयार - महादेव जानकर
भुजबळ साहेब तुम्ही कमांडर बना, डिमांडर नको. ज्यांना सोबत यायचे ते येतील. आम्ही तुमच्या सोबत युती करायला तयार आहोत पण त्यांच्यासोबत युती करणार नाही, असं ठणकावून महादेव जानकरांनी ओबीसी सभेमधून ठणकावून सांगितलं. आम्ही पैशालाही कमी नाही. मी 100 वंजाऱ्यांना सांगेल 1 - 1 कोटी रुपये द्या. आज छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे एकत्र आले असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती, असं वक्तव्य देखील महादेव जानकरांनी ओबीसी सभेतून केलं.
पुढच्या वेळेस दलित आणि मुस्लीम यांना सोबत घ्या - जानकर
छोट्या लोकांना तिकीट मागायला कशायला जायचं? आम्ही कमांडर आहोत. उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यांनी पक्ष काढला म्हणून त्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे भुजबळ पुढच्या वेळेस दलित आणि मुस्लीम यांना देखील सोबत घ्या, असं जानकरांनी म्हटलं.
सभेला 'हे' नेते उपस्थित
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, विशेष निमंत्रितनामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, नाना पटोले, जयदत्त क्षीरसागर, विनय कोरे, बबनराव तायवाडे, विजय चौगुले, प्रा. टी.पी. मुंडे, शब्बीर अहमद अन्सारी, सुनील महाराज, लक्ष्मणराव गायकवाड, मच्छिद्र भोसले, चंद्रकांत बावकर, कल्याण दळे, राजेश राठोड यांच्यासह स्थानिक नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती.