डोंबिवली (मुंबई) : स्फोट एक, प्रश्न अनेक. डोंबिवलीच्या एमआयडीतील स्फोटाने महाराष्ट्रभरातील एमआयडीसींची आणि त्या शेजारी राहणाऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण जे संकट डोंबिवलीत उद्भवलं, ते उद्या कोणत्याही एमआयडीसीत घडू शकतं.


 

 

बेचिराख झालेली प्रोबेस कंपनी प्रोपार्जिल ब्रोमार्ड आणि क्लोराईडचं उत्पादन करत होती, जे बहुतांश निर्यात होत असे. पण त्या केमिकलच्या उत्पादनासाठी बॉयलर हा नितांत गरजेचा होता. त्याच बॉयलरमध्ये स्फोट झाला आणि डोंबिवली हादरली. डोंबिवलीत अशा किमान 400 कंपन्या आहेत.

 

 

फक्त डोंबिवलीच नाही, तर अशा रसायनांचं उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रभरात अनेक एमआयडीसी आहेत.

 

 

- रत्नागिरी एमआयडीसीत 80 केमिकल कंपन्या आहेत. त्यातील 20 मोठ्या तर 60 कंपन्या छोट्या आहेत. या कंपन्यांना खेटून 5 हजारांची वस्ती आहे.

 

 

- रायगड एमआयडीसीत 35 कंपन्या आहेत

 

 

- महाडमध्ये 70 पैकी 30 कंपन्या सुरु आहेत. तर नावातच रसायन असलेल्या रसायनीत 17 कंपन्या आहेत.

 

 

- नवी मुंबईतील ठाणे बेलापूर एमआयडीसीत तब्बल एक हजार केमिकल कंपन्या आहेत.  ज्यांच्या शेजारी रबाळे, पावणे, तुर्फे, महापे आणि शिरवणेसारख्या लोकवस्त्या आहेत, ज्या लोकवस्त्यांमध्ये लाखो लोक राहतात.

 

 

या सगळ्या एमआयडीसी धोकादायक आहेत, असं नाही. पण त्या कंपन्यांच्या आसपास मानवी वस्ती वाढली आहे आणि तिथेच खरी चिंता आहे. खरंतर कंपन्या या आधीच शहराबाहेर असतात. कालांतराने तिथे मानवी वस्ती वाढू लागते आणि त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो.

 

 

एमआयडीसी आणि त्याभोवती असलेलं मानवी वस्तींचं जाळं हा एक सुप्त ज्वालामुखी आहे. त्यामुळे तो फुटण्याआधीच कंपन्यांचं विस्थापन आणि नव्या जागी सुरक्षित अंतरावर मानवी वस्ती अशी रचना गरजेची आहे. अन्यथा आणखी एक डोंबिवली व्हायला वेळ लागणार नाही.