मुंबई : स्वप्नातलं घर मुंबईत शोधणाऱ्यांसाठी आता आणखी एक खुशखबर आली आहे. काही दिवसांपूर्वी म्हाडाने 2030 घरांची लॉटरी जाहीर केली होती. मात्र, या घरांच्या किंमती पाहून अनेकांनी अर्जप्रक्रियकडे पाठ फिरवली. आता म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील घरांच्या किंमतीत तब्बल 10 ते 12 लाख रुपयांची कपात केली आहे. म्हाडाच्या जाहिरातीमधील विकास नियंत्रण नियमावली 33 (5) व 33 (7) आणि 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून प्राप्त झालेल्या म्हाडाच्या हिश्श्यातील गृहसाठ्यापैकी 370 सदनिकांच्या विक्री किंमती सुमारे 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत आल्या आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याबाबत माहिती दिली. म्हाडाच्या घरांच्या किंमती अव्वाच्या सव्वा होत्या, परवडणारी घरं देणाऱ्या म्हाडाने लॉटरी जाहीर केल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. कारण, या घरांच्या किंमतीची कोटींची उड्डाणे पाहायला मिळाली होती. यातील, सर्वात महागडे घर 7 कोटींपर्यंत होते. तर, बहुतांश घरांच्या किंमती ह्या कोटींच्या घरात असल्याने उमेदवारांनी लॉटरीकडे पाठ फिरवली होती. 


पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून म्हाडाला (Mhada) गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या 370 सदनिका संगणकीय सोडत प्रणालीतून विक्रीसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 25 टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच अल्प उत्पन्न (Income) गटातील सदनिकांच्या किंमती 20 टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 15 टक्क्यांनी आणि उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले. त्यानुसार सुधारित किंमती मुंबई (Mumbai) मंडळाद्वारे लवकरच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसेच प्रसिद्धी पत्रकांद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र, मंत्री महोदयांच्या या घोषणेनुसार, म्हाडाचे मुंबईतील अत्यल्प गटातील 39 लाखाचे घर 29 लाखात, 62 लाखाचे घर 50 लाख रुपयांनी स्वस्ता खरेदी करता येणार आहे. म्हाडाच्या एकूण 370 घरांच्या (Home) किंमती तब्बल 10 ते 12 लाख रुपयांनी स्वस्त झाल्याने आता अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढू शकते. 


अर्ज करण्यासाठी मुदतवाढ


दरम्यान, म्हाडाने घरांच्या किंमती कपात केल्यानंतर अर्जदारांना उर्ज करण्याच्या मुदतीतही वाढ केली आहे. यापूर्वी 4 सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम मुदत होती, ती वाढवून आता 19 सप्टेंबर करण्यात आली आहे. तर, संगणकीय सोडतीच्या वेळापत्रकामध्ये झालेल्या बदलामुळे प्राप्त अर्जाच्या संगणकीय सोडतीचा दिनांक व ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केले जाणार आहे. 


सर्व गोष्टी ऑनलाईन


म्हाडाचा पुढील उद्देश नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता सुनिश्चित करणे आहे. म्हाडाने सदनिकांच्या विक्री करता IHLMS 2.0 ही पारदर्शक संगणकीय सोडत प्रणाली देखील कार्यान्वित केली आहे, यामध्ये आपण नोंदणी पासून ते सदनिकेचा ताबा मिळेपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन केल्या आहेत. लोकांपर्यंत जलद गतीने म्हाडा संबंधित माहिती पोहोचवणे आणि त्यांच्याशी जोडून राहण्यासाठी म्हाडाच्या समाज माध्यम व्यासपीठावर सक्रिय आहोत. म्हाडाच्या शुभंकर चिन्हात येत्या काळात चॅटबॉक्सचा देखील अवलंब केला जाईल, असे म्हाडाचे सीईओ संजय जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.


या घरांच्या किंमतीत होणार कपात





 


हेही वाचा


मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?