मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या जमिनीवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार एकमेकांसमोर आहे. मात्र कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. कांजूरमार्ग कारशेडच्या जागेच्या वादाबाबत आदित्य ठाकरे यांनी एबीपी माझाशी त्यांनी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. कांजूरमार्ग येथील जागेवर केंद्र सरकारने दावा केला आहे. ही जागा आपल्या मालकीची असून ती एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे.
कांजूरमार्ग कारशेडची जागा राज्य सरकारचीच आहे. मेट्रो कारशेड आरे येथून कांजूरमार्गला नेलं यासाठी केवळ झालं हेच कारण नाही. आरेमध्ये विविध प्रकारचे वन्यजीव आहेत, त्यांचं संवर्धनही महत्त्वाचं आहे. याशिवाय आरे येथे मेट्रो कारशेड झाल्यास मीठी नदीचा प्रवाहात अडथळा निर्माण झाला असता. कांजूरमार्ग येथील जागेसाठी केंद्रांची परवानगी घ्यायची गरज नाही, कारण जागा राज्य सरकारची आहे. आम्ही लोकांच्या भल्याचा विचार करतोय, मात्र कुणाच्या पोटात दुखल असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्राचा दावा, फलकही लावला!
विरोधक विनाकारण याचं राजकारण करत आहेत. विरोधी पक्षाकडून सुरु असलेलं राजकारण लोक पाहत आहेत, त्यांना सगळं कळतं. आम्ही चांगल्या हेतूने काम करतो. राजकारण आम्ही लोकांची कामं करण्यासाठी करतो. आरेहून लोकांच्या भल्यासाठी कारशेडचं स्थलांतर केलं. कारशेड कांजूरमार्गला नेल्याने मुंबईकरांचा फायदाच होणार आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राचा दावा धक्कादायक! ती जमीन राज्याचीच : सुप्रीया सुळे
कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा धक्कादायक आहे. ती जमीन महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करत आहे. त्यांच्या कृतीतून ते दिसतंय, हे दुर्दैवी आणि निंदाजनक आहे. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करत आहेत? जमीन महाराष्ट्राची आहे ती विकास कामासाठी वापरली जातेय, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.