मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनाची लागण झाल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार सुरु होते. देवेंद्र फडणवीस यांना पुढचे 7 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे सुप्रीटेंडेंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी दिला आहे. फडणवीस त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर राहणार आहेत.


देवेंद्र फडणवीस यांची 24 ऑक्टोबर रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी ट्विट करुन सांगितलं होतं. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादन केले. डिस्चार्ज मिळाल्यानंतर फडणवीसांनी ट्वीट करुन डॉक्टरांचे आभार मानले. आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज रुग्णालयातून घरी परतलो आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरही सर्व कर्मचारी वृंद तसेच त्यांनी केलेले सहाय्य, घेतलेली काळजी, उपचार यासाठी मी अत्यंत आभारी आहे. मला लवकर बरे वाटावे, यासाठी ज्यांनी सदिच्छा दिल्या, त्यांचेही अनंत आभार!





देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीग्रस्त भागात फिरत होते. तसंच बिहार निवडणुकीचे प्रभारी असल्या कारणाने त्यांचे बिहारचे देखील दौरे सुरु होते. शिवाय राज्यात थेट माणसांमध्ये जाऊन त्यांनी गाठीभेटी घेतल्या आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटनुसार त्यांनी 22 तारखेला छपरा, मोतिहारी आणि समस्तीपुरमधील एनडीए कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीला त्यांनी संबोधित केलं होतं.