शिर्डी : राज्यभर दिवाळी सणाच्या खरेदीसाठी गर्दी होताना दिसत असून शिर्डीत मात्र चित्र उलट आहे. शिर्डी शहराच्या सर्वच भागांत व्यवसाय सुरू मात्र रस्त्यांवर शुकशुकाट असं चित्र दिसून येतंय. 17 मार्चपासून साई मंदिर बंद असून सर्वच व्यवसाय अडचणीत आले आहे. त्यातच दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपला असताना व्यावसायिकांसह हातावर पोट भरणाऱ्या मजुरांपुढे दिवाळी सण साजरा कसा करायचा हा प्रश्न निर्माण झालाय.


देशात 6 व्या अनलॉकला सुरवात झाली असली तरी राज्यात मात्र मंदिरांना मात्र टाळे कायम असून मंदिरावर आर्थिक परिस्थिती अवलंबून असणाऱ्या व्यावसायिक, फुल व प्रसाद विक्रेते , हॉटेल चालक यांना मोठ्या आर्थिक संकटांना समोर जाण्याची वेळ आलीय. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी समजला जातो, मात्र मंदिर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असल्याने यावर्षी दिवाळी साजरी कशी करायची हा प्रश्न निर्माण झालाय.


एकीकडे व्यावसायिक अडचणीत तर दुसरीकडे रोज सामान विक्री करून पोट भरण्यासाठी कष्ट करणाऱ्या वर्गातील किरकोळ विक्रेत्यांना तर यावर्षी दिवाळी साजरी करणं अवघड असंच चित्र दिसून आलं. गेल्या सहा महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने शेतीवर काम केले मात्र आता ते सुद्धा नाही. दुकाने सुरू झाली मात्र मंदिर बंद असल्याने पगार कमी त्यात दिवाळी करायची कशी असा प्रश्न दुकानात काम करणाऱ्यांना मजुरांना निर्माण झालाय.


एकीकडे राज्यात सर्व व्यवसाय सुरू झाले तर दुसरीकडे मात्र मंदिर प्रशासन सर्व तयारी करून सज्ज असताना मंदिर उघडली जात नाही. मात्र याच मंदिरावर एक दोन कुटुंब नव्हे तर अख्या गावाची आर्थिक स्थिती अवलंबून असताना सरकार दुर्लक्ष करत असून याच मुळे दरवर्षी गोड समजली जाणारी दिवाळी या लोकांसाठी कडू ठरणार यात शंका नाही.