रेल्वे-मेट्रो डब्यांची निर्मिती मराठवाड्यात, 15 हजार रोजगार
एबीपी माझा वेब टीम | 20 Feb 2018 06:59 PM (IST)
रेल्वे आणि राज्य सरकारचा एमआयडीसी विभागात 600 कोटींचा करार झाला आहे.
मुंबई : 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला आनंदाची बातमी दिली आहे. लातूरमध्ये रेल्वे आणि मेट्रोसाठी डबे तयार होणार आहेत. त्यामुळे तब्बल 15 हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. रेल्वे आणि राज्य सरकारचा एमआयडीसी विभागात 600 कोटींचा करार झाला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईही उपस्थित होते. लातूरमधल्या कोच बांधणी प्रकल्पात 15 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. लातूर, बीड, परभणी या क्षेत्रात रेल्वे आणि मेट्रो कोच बांधणीसाठी वेंडर्सची इको सिस्टम उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाडा हा 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चा खरा लाभार्थी ठरणार आहे. जानेवारी महिन्यात रेल्वेमंत्र्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीसांनी या प्रकल्पाबाबत घोषणा केली होती. लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील–निलंगेकर यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला होता.