सिंधुदुर्ग : तळकोकणाला आज दिवसभर मुसळधार पावसाने झोडपले असून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील निर्मला नदीला पूर आल्याने कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. तर कुडाळ तालुक्यातील वेताळ बाबर्डे येथे पुराच्या पाण्याने दोन घरांना वेढा घातला आहे. तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी बांदा आळवाडी-मच्छीमार्केट बाजारपेठेत घुसले तर बांद्यातील निमजगा रस्ता पाण्याखाली गेला. बांद्यातील बाजारपेठतील दुकानांमध्ये पाणी घुसले. दोडामार्ग मधील घोडगे परमे पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे तिलारी नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कता इशारा दिला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वेंगुर्ले तळवडे बेळगाव राज्यमार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15 ते 18 जुलैला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे. संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.
अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करु नका. घरा बाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची आणि पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तुंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्र कक्ष- 02362-228847 किंवा टोल फ्री - 1077 ला संपर्क करावा, तसेच तालुका नियंत्रण कक्ष दोडामार्ग तालुक्यासाठी - 02363-256518, सावंतवाडी तालुक्यासाठी - 02363-272028, वेंगुर्ला तालुक्यासाठी - 02366-262053, कुडाळ तालुक्यासाठी - 02362-222525, मालवण तालुक्यासाठी - 02365-252045,कणकवली तालुक्यासाठी - 02367-232025, देवगड तालुक्यासाठी- 02364-262204, वैभवाडी तालुक्यासाठी - 02367-237239, या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.
पुराच्या पाण्यात, समुद्रात नागरिकांनी सेल्फी काढू नये. आपतकालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.