सिंधुदुर्ग : आज जागतिक पर्यावरण दिन तसेच वटपौर्णिमा असा दुहेरी योग जुळून आला आहे. हिंदू धर्मातील एका महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे वट पौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात गवदेव भागात पुरुषही वटपौर्णिमा साजरी करतात.


महिला ज्याप्रकारे वटपौर्णिमा साजरी करता त्याच पद्धतीने पुरुषही वटपौर्णिमा साजरी करतात. गेल्या काही वर्षांपासून पुरुष मंडळी एकत्र येत वटपौर्णिमा साजरी करत आहेत. विधीवत पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडाला फेऱ्याही मारल्या जातात. त्यात विवाहित आणि अविवाहित पुरुष सुद्धा आहेत. पत्नी आपल्या पतीला जसं दीर्घायुष्य मिळावे म्हणून पूजा करता तसेच हे पुरुष आपल्या पत्नीला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य मिळावं यासाठी पूजा करतात.



"वटपौर्णिमेचं व्रत हे नवरा-बायकोमधील प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी आहे. नेहमीच स्त्रियांनीच का व्रत करावं? स्त्रियांचं संसारातील त्याग असतो, त्याला प्रतिसाद म्हणून नवऱ्याने व्यक्त करावं त्यामधून ही संकल्पना उदयास आली. त्यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढावं, संसार सुखाने व्हावा यासाठी नवऱ्यानेही व्रत करावा असं ठरवलं. त्यामुळे नऊ वर्षांपासून आम्ही हा व्रत करत आहोत, यापुढेही करणार आहोत," अशी प्रतिक्रिया वडाच्या झाडाची पूजा करणारे डॉ. संजय निगुडकर यांनी दिली.


कोरोनामुळे घरातच राहून सण साजरा
खरंतर महिला आज हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने जिल्ह्यातील अनेक भागात स्त्रियांनी सुरक्षित राहून आणि नियमांचे पालन करुन ही परंपरा कोकणात जपताना पाहायला मिळत आहे. अनेक महिला घरातच राहून वटपौर्णिमेचा सण कोरोनाच्या सावटामुळे साजरा करत आहेत. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. त्यात आज जागतिक पर्यावरण दिन देखील असल्याने दुहेरी योग जुळून आला आहे.


सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. वडाचं झाड गर्द सावली देखील देतं. अशा वटवृक्षाची पूजा करुन स्त्रिया स्वतःसाठी आणि पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.


मोदकाच्या आकाराचा गरा



वटपौर्णिमा सणाला कोकणात अनन्य साधारण महत्व आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वटपौर्णिमेला फणसाला महत्त्व दिले जाते. आज वटसावित्रीच्या व्रताच्या वाणात फणसाचे गरे असतात. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव गावात एका फणसाच्या गाऱ्याला मोदकाचा आकार आल्याचं समोर आलं. खरंतर फणसाच्या गरे हे विशिष्ट प्रकारचे असतात. मात्र एका फणसात मोदकाच्या आकाराचा एक गरा पाहायला मिळाला. मोदकाच्या आकाराचा गरा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे