कृष्णा नदीने 20 फुटाची पातळी ओलांडताच पूर पट्ट्यातील नागरिकांना सक्तीने स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे पुराच्या संकटापूर्वीच नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे नियोजन आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून करण्यात आले आहे. मात्र यंदाच्या आपत्तीत नागरिकांना वेळेपूर्वीच सुरक्षितपणे बाहेर पडावे लागणार आहे. याचबरोबर कोरोनाच्या महामारीमुळे यंदा पूरग्रस्त म्हणून कोणालाही एकत्र ठेवले जाणार नसल्याने पूर पट्ट्यातील नागरिकांना आपली व्यवस्था स्वतःच करावी लागणार आहे. त्यामुळे आयुक्तांच्या या नियोजनामुळे नागरिकांना आपले नुकसान टाळता येणार आहेत शिवाय कोणतीही जीवित हानीही होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
सांगली महापालिका क्षेत्रात मागील महापुराचा अनुभव आणि काही त्रुटी याचा विचार करून यंदाचा आपत्ती नियोजन आराखडा महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तयार केला आहे. मागील आपत्ती वेळी अचानक पाणी वाढले आणि नियोजनात काहीश्या त्रुटीही निर्माण झाल्या. मात्र मागील पुराचा अनुभव लक्षात घेता आयुक्त कापडणीस यांनी आपल्या पूर आपत्तीचा आराखडा तयार केला आहे.
यासाठी महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांची टीम सज्ज झाली आहे. यामध्ये महापालिकेने सर्व आपत्कालीन यंत्रणेसह मनुष्यबळ, स्वयंसेवी संस्था, तसेच आपत्ती मित्र यांच्याशी समन्वय साधत यंदाचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार महापालिका यंत्रणा कृष्णा नदीची पाणीपातळी 20 फूट ओलांडताच मनपा यंत्रणा पुरपट्ट्यातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याबाबतचे आवाहन पोलिसांच्या मदतीने करणार आहे.
पुराच्या स्थितीत शहराचा पाणीपुरवठा नियमित राहील याबाबत सुद्धा नियोजन केले आहे. आपत्कालीन स्थितीत मोबाईल यंत्रणा सुरळीत राहावी, यासाठी सुद्धा योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. याचबरोबर पूर पट्ट्यातील लोकांना आपत्ती पूर्व प्रशिक्षण दिले जात असून आपत्ती काळात सेवेसाठी स्वतंत्र पथकही असणार आहे. याचबरोबर आपत्ती काळात कोणतीही जीवितहानी होणार नाही याबाबत मनपाचे प्रशासन काळजीपूर्वक प्रयत्न करीत असून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे सर्व आपत्कालीन विभाग सज्ज झाले आहेत.
सध्या निसर्ग चक्री वादमाळमुळे पर्जन्यवृष्टी सुरू आहे. धरणातील विसर्ग पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत अचानक वाढ संभवत नाही. आर्यविन पुल, सांगली येथील नदीतील पाणी पातळी बंधाऱ्यातील पाणी साठ्यामुळे 5 फूट 9 इंच इतकी आहे. सध्या कोयना, धोम, कन्हेर, उरमोडी, तारळी, वारणा धरणातून पूरनियंत्रणासाठी पाणी सोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे.
आपत्तीसाठी मनपाची सज्ज यंत्रणा
- एकूण फायर कर्मचारी 62
- अग्निशामक गाड्या 7, 1 रेस्क्यू व्हॅन
- 50 लाईफ जॅकेट, 25 लाईफ रिंग
- वुड कटर 10, कॉम्बी टूल्स 2
- यांत्रिक फायबर बोटी 7 , ओबीएम मशीन 7
- आपत्ती काळातील साहित्य उपलब्ध
असे असेल नियोजन
- पाच ठिकाणी 24 तास बोट स्टेशन
- सांगली वाडी, कर्नाळ चौकी, टिळक चौक, होंडा शोरूम, कृष्णा घाट मिरज या प्रत्येक ठिकाणी 1 बोट आणि चार कर्मचारी कार्यरत असणार आणि लोकांना मदत करणार
- मोठे पुरवठादार, एनजीओ स्वयंसेवक, स्वीमर यांच्याशी समन्वय मनपाचा समन्वय असणार
- मंगलधाम मध्ये 15 दिवसात वेधर मोनिटरिंग स्टेशन सुरू होईल तसेच आपती नियोजन प्रशिक्षणाचा हॉलही कार्यान्वित होईल
- आपत्तीपूर्व प्रशिक्षण लोकांमध्ये जा जागृती, तात्पुरत्या व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या जात आहे
- पाणी पातळी वाढत चालल्यास 15 ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेरेद्वारे पूरपातळी रेषेवर वॉच राहणार
- आपत्ती काळात पोलिसांची मदत घेऊन लोकांना स्थलांतरीत होण्याची विनती करणार
- आपत्ती काळात मोबाईल टॉवर, एमएसइबी यांना सतर्क केले जाणार
- इमर्जन्सी सेवेसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार
कर्मचारी सुरक्षेबाबत दक्षता
मनपा वैद्यकीय पथक तैनात असणार
जे आपत्तीपूर्व आणि नंतर तसेच वेळोवेळी तपासणी करेल
नागरिकांनी या गोष्टी कराव्यात
- कृष्णा नदीने 25 फुटाची पातळी ओलांडली तर लोकांनी सुरक्षितपणे आपले साहित्य, जनावरांसहित बाहेर स्थलांतरित व्हावे
- मुख्य मार्गावरील दुतर्फा पार्क केलेल्या गाड्या रिकाम्या जागी लावाव्यात
- आपल्या घरातील महत्वाची कागदपत्रे किंवा साहित्य वेळीच हलवावे
सध्याच्या घडीला धरणामध्ये असलेला पाणीसाठा व कंसात विसर्ग क्युसेक्समध्ये
कोयना 32 टक्के (2100)
धोम 40 टक्के (584)
कन्हेर 26 टक्के (325)
उरमोडी 62 टक्के (262)
तारळी 39 टक्के (450)
वारणा 33 टक्के (निरंक).