लातूर : रस्ते अपघातात कुणी माणूस जखमी झाल्यास वेळेवर उपचार होतात. त्यांना वेळेवर मदत मिळते. मात्र, एखाद्या अपघातात जखमी झालेल्या मुक्या प्राण्यांना कोणीच पहात नाहीत किंवा त्यांच्यासाठी पुढे येऊन मदत करत नाहीत. मात्र, लातुरात मुस्लिम मोर्चाला जाण्याचं सोडून महेबूब चाचांनी एका गाईच्या वासराचा जीव वाचवला.


लातूर शहरात बुधवारी मुस्लीम आरक्षण मोर्चाची धामधूम सुरु होती. पुरुष मंडळी मोर्चाला जाण्याच्या लगबगीत होती. सकाळी आठच्या दरम्यान लातुरातील प्राणीमित्र महेबूब इसाक सय्यद यांना फोन आला. त्यांनी मोर्चाला जाणे सोडून दिले. मुलाला पाठवले ते सरळ गरुड चौकात गेले.

चार दिवसांपूर्वी एका गाडीच्या धडकेत गाईचं वासरु कायमच अपंग झाले होते. तीन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्या वासराच्या पायाला चिंध्या बांधल्या होत्या व त्याला उचलून रस्त्याच्या दुभाजकात ठेवले होते. त्याची आई वासराचे भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्याच्याजवळच उभी होती.

महेबूब चाचाने तातडीने आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने त्या वासराला टेम्पोत घालून पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी तुटलेल्या पायांवर शस्त्रक्रिया करून टाके घातले. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळीच जर उपचार झाले असते तर कदाचित हे वासरु दोन्ही पायांवर उभे राहू शकले असते.

आता जीव वाचला तरी त्याला त्याच्या पायावर उभे राहता येणार नाही. वासराचा जीव वाचला. मात्र, त्याला सांभाळायचे कोणी, त्याची जखम बरी होईपर्यंत देखभाल कोणी करायची, असा प्रश्न होता. ज्या ठिकाणाहून आणले त्या ठिकाणी सोडले तर भटकी कुत्री त्याला फाडून खातील. या विचाराने महेबूब चाचाने त्याला घरी नेले. डॉक्टरांनी त्याच्या पायाखाली गादी करावी लागेल, असे सांगितल्यानंतर महेबूब चाचाने स्वत:च्या हाताने गवत घालून गादी तयार केली.

आज ते वासरू जगले आहे आणि महेबूब चाचा त्याची देखभाल करत आहेत. व्यवसायाने टेम्पो चालक असलेले चाचा कोणतीही मदत न घेता स्वात:च्या खर्चातून अनेक वर्षांपासून पशुपक्षांचा सांभाळ करत आहेत.

संवेदनशीलता, प्रेम, जिव्हाळा हे सारं मनापासून असावं लागतं. महेबूब चाचा पोटच्या लेकराप्रमाणे त्या वासराची काळजी घेत आहेत. त्याला हिरवे गवत व पाला खाऊ घालत आहेत.

‘वाहन चालवणाऱ्याने रस्त्यावरील सर्वांचीच काळजी घ्यायला हवी. त्या जागी एखाद्या मातेचे मूल असते व ते कायमचे अपंग झाले असते तर तिला काय वाटले असते? गोमातेच्या भावना व त्या महिलेच्या भावना यात काही फरक आहे का?’ असा प्रश्न चाचा विचारत आहेत.