यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने काळा पैसा साठवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, तर दुसरीकडे या निर्णयाने 'गोल्ड नंबर'च्या नोटा गोळा करण्याचा छंद जोपासणाऱ्यांचाही हिरमोड झाला आहे.

यवतमाळमधील पुसद येथे अनोख्या क्रमाकांच्या नोटा जमवण्याचा छंद असलेले शेतकरी दीपक आसेगांवकर यांचीही निराशा झाली आहे. 2001 साली त्यांना एकशे अकरा क्रमांक असलेली पाचशे रुपयांची नोट मिळाली. त्यानंतर त्यांनी अशा गोल्ड क्रमांकाच्या नोटा गोळा करण्याचा छंद सुरु केला.

गेल्या 15 वर्षात आसेगांवकर यांनी 1 लाख 35 हजाराच्या गोल्ड नोटा गोळा केल्या. चढते उतरते क्रमांक, सलग क्रमांक, लकी मानल्या जाणार 786 असलेले क्रमांक याप्रमाणे त्यांनी संग्रह केलेल्या नोटांचे प्रदर्शनही पुसदमध्ये भरवण्यात आले होते.

1.35 लाख रुपयांच्या गोल्ड नंबरी नोटांमध्ये पाचशे रुपयांच्या 120 नोटा, तर एक हजार रुपयांच्या 75 नोटा आहेत. लकी नंबर मानल्या जाणाऱ्या 786 क्रमांकाच्या 28 नोटा आहेत. यामध्ये 5, 10, 50, 100 रुपयांच्या 100 नोटा आहेत. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत त्यांनी केलं आहे. छंदाला जड अंतःकरणाने बासनात गुंडाळून या नोटा बँकेत जमा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

इतकी वर्ष जोपासलेला हा ठेवा नाईलाजाने बदलावाच लागेल, हा विचार त्यांना उदास करतो. मात्र पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या नोटा बँकेत जमा करुन छंद सुरुच ठेवू असा निश्चयही त्यांनी केला आहे.