सिंधुदुर्ग :  उद्धव ठाकरे यांनी कोकणाच्या विकासाला काय योगदान दिलं ते सांगावं. मुख्यमंत्र्यांचं कोकण प्रेम खोटं आहे. पर्यटन निधी, विकास कामांना दिलेली स्थगिती उठवावी. आधी कोकणासाठी जाहीर केलेला निधी द्यावा, मग आम्ही कोकणाच्या विकासकामांच्या बैठकीला जाऊ, असं खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे. उगाच कोकण प्रेम दाखवयाचं, आमच्या ग्रामपंचायत सदस्याला जेवढी माहिती आहे, तेवढीही माहिती मुख्यमंत्र्यांना नाही, अशी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.


मुख्यमंत्र्यांनी गणपतीपुळे आणि भराडी देवीचं दर्शन घेतलं, मात्र कोकणाचा विकास थांबवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना देवी पावणार नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं. मी मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याला भरघोस निधी दिला होता. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा मुख्यालयात फक्त दोन मंत्र्यांची मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यातून कोकणाच्या विकासाला किती निधी मिळतो हे पाहावं लागेल. पैसे काढून देण्याचं ज्ञान मुख्यमंत्र्यांना अवगत नाही. कोकणातील विकासकामांना दिलेली स्थगिती उठवावी, एवढं केलं तरी खूप आहे, असं नारायण राणेंनी म्हटलं.


नाणार प्रकल्पाबाबत बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं की, नाणार प्रकल्पाच्या जवळ जायचा प्रयत्न आहे. नाणार प्रकल्पात तडजोड झाली आहे. मुख्यमंत्री तडजोड करायला या पदावर आले आहेत. नाणार प्रकल्पामागे अर्थकारण लपलंय, त्यामुळे कामं थांबवायची आणि कंत्राटदारांना बोलवायचं हे काम चाललं आहे, असा आरोप नारायण राणेंनी केला. मुख्यमंत्री रत्नागिरीत गेल्यावर नाणार संदर्भात ना समर्थकांना भेटले, ना विरोधकांना भेटले. याआधी रत्नागिरीत येऊन नाणार होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र काल सामनामध्ये आलेल्या जाहिरातीवरुन उद्धव ठाकरे दुतोंडी असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.


महाविकास आघाडीचं सरकार राज्याच्या दृष्टीनं योग्य नाही. सरकारचा प्रत्येक दिवस मागे जाण्यासारखा आहे. सरकारमधील तीन पक्षांचे अंतर्गत प्रश्न चव्हाट्यावर येत आहेत. जनतेच्या हिताचं हे सरकार नाही. मुख्यमंत्री मंत्रालयात किती तास बसतात? काय केलं त्यांनी आतापर्यंत, नुसते दौरे काढायचे. मंत्रालयात सगळीकडे भ्रष्टाचाराची दुकाने चालत आहेत. सर्व कामांना स्थगिती दिली जात आहे. मी नेहमीच चांगल्याला चांगलं बोलत असतो. चागलं काम केलं तर मी कौतुक करणार. चांगलं काम केलं तर त्यांना जेवायला देखील बोलवेन, असं नारायण राणे म्हणाले.