27 नोव्हेंबरपासून लसीकरणाच्या मोहिमेस प्रारंभ झाला. दररोज सुमारे 10 लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते पुर्ण करण्यासाठी आरोग्ययंत्रणा प्रयत्न करीत आहे. सध्या ही मोहीम राज्यातील सुमारे 94 हजार शाळांमधून सुरु आहे. मोहिमेला सुरुवात होऊन एक महिना पुर्ण होण्याच्या आज सुमारे 2 कोटी 10 लाख बालकांना लसीकरण करण्यात यंत्रणेला यश आले आहे.
काही विशिष्ट भागात, विद्यालयांमध्ये, उर्दू शाळांमध्ये लसीकरणासाठी विरोध होत होता. त्या पार्श्वभूमीवर 20 डिसेंबरला आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध मुस्लीम संस्थाचे प्रतिनिधी आणि उलेमा बोर्डाचे अध्यक्ष यांच्या समवेत इस्लाम जिमखाना येथे बैठक झाली होती. यावेळी मुस्लीम समुदायांमध्ये गैरसमजातून जे मुद्दे समोर आले होते. त्यावर चर्चा करण्यात आली.
मुस्लीम समाजातील डॉक्टर्स त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेत काम करणारे डॉ.मुजीब यांनी यावेळी गोवर-रुबेला लसीकरण आरोग्यासाठी कसे उपयुक्त आहे, त्याचा शास्त्रीय आधार देत मार्गदर्शन केले. ही मोहीम राज्यातील बालकांना गोवर-रुबाला सारख्या गंभीर आजारापासून संरक्षण देण्यासाठी असून माझ्या नातवंडांना ही लस मी दिली आहे. गैरसमज न करुन घेता पालकांना लसीकरणासाठी तयार करावे, याबातचा सकारात्मक संदेश धर्मगुरुंनी द्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी बैठकीत केले होते.
पहिल्या टप्प्यात काही ठिकाणच्या शाळांमधून अल्प प्रतिसाद
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात काही ठिकाणच्या शाळांमधून अल्प प्रतिसाद मिळत होता. प्रभावीपणे केलेली जाणीव जागृतीमुळे आता शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, लसीकरण मोहीम कशाप्रकारे राबविण्यात येत आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत राज्यभरात 26 हजार ठिकाणी परिरक्षण मोहीम हाती घेण्यात आली. लसीकरणाचे ठिकाण, लसींची उपलब्धता, सिरिंजचा वापर, लस देण्याची शास्त्रशुद्ध पद्धत, लसीकरणादरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या तातडीच्या उपाययोजनांची औषधांची उपलब्धता अशा विविध 21 प्रकारच्या निकषांची मोहिमेदरम्यान तपासणी करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्राला सरासरी 99 टक्के गुण मिळाले आहेत.
लसीकरणादरम्यान ज्या बालकांना पालकांनी गैरसमजुतीतून लस दिली नाही, अशा पालकांकडून आता लसीकरणासाठी विचारणा होत आहे. शाळेशिवाय बालकांना लसीकरण करता येईल काय, अशा स्वरुपाचे प्रश्न पालकांकडून विचारले जात आहेत. जी बालकांना लसीकरण झाले नाही त्यांच्यासाठी आता शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही लस मोफत दिली जाणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
संबंधित बातम्या