सांगली : सिंचन योजना पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांत शाब्दिक युद्ध रंगले आहे. काल सांगलीत आयोजित शेतकरी मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, "आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांमध्ये पूर्णपणे डबाबंद पडलेल्या योजना आम्ही पूर्ण केल्या." त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी "बंद पडलेल्या सिचन योजना शेवटी- शेवटी कशाला सुरु करायच्या?" असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.


शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सांगली जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, "युती सरकारने सुरू केलेल्या परंतु आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांमध्ये पूर्णपणे डबाबंद पडलेल्या योजना आम्ही पूर्ण केल्या." तर अजित पवार म्हणाले की, "बंद पडलेल्या सिंचन योजना सत्तेचा कार्यकाळ संपत आल्यानंतर का सुरु केल्या?

मुख्यमंत्री म्हणाले की, "सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ येथील पाण्याचा समस्या सोडवण्यासाठी या परिसराला जमिनीखालून पाइपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला. त्यामुळे सरकारला जमीन अधिग्रहित करावी लागली नाही. तसेच या योजनांवरचे सरकारचे 800 कोटी रुपये वाचले."

"टेंभू, ताकारी , म्हैसाळ सारख्या योजना युती सरकारच्या काळात सुरू झाल्या आणि मध्यंतरीच्या पंधरा वर्षांमध्ये (आघाडी सरकारच्या कार्यकाळात) पूर्णपणे डबाबंद होत्या. या योजनांच्या कामाची आम्ही सुरुवात केली आणि पुढच्या सहा महिन्यात या योजनांचे टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करणार आहोत," असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

याबाबत अजित पवार म्हणाले की, "सिंचन योजना बंद पडलेल्या होत्या तर शेवटी शेवटी कशाला सुरु करायच्या? या बंद पडलेल्या योजना सरकारला पूर्ण करायच्या होत्या तर चार वर्षांपूर्वी सरकारमध्ये आले होते, तेव्हा का नाही केल्या? सत्तेचा कार्यकाळ संपत आल्यानंतर का सुरु केल्या आहेत?"

अजित पवार म्हणाले की, "केंद्रामध्ये नितीन गडकरी या खात्याचे मंत्री आहेत, राज्य सरकार या लोकांच्या ताब्यात आहे. खरे तर पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल पाहून भाजपच्या नेत्यांना काय घोषणा करावी आणि काय नको असे वाटू लागले आहे. परंतु आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना आपलंसं करण्याचा भाजप सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे, हेच यातून सिद्ध होते."