नवी दिल्ली : राज्यात एमबीबीएसच्या जागा वाढणार आहेत, तसेच 7 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये देखील सुरू होणार आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारला याबाबत प्रस्ताव सादर केला होता, त्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.


राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची काल दिल्लीत भेट घेतली. महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण विभागासाठी काही प्रस्ताव गिरीश महाजन यांनी डॉ. हर्ष वर्धन यांना सादर करुन यावर सविस्तर चर्चा केली.


महाराष्ट्रात डॉक्टरांची संख्या लक्षात घेता एमबीबीएसची प्रवेश क्षमता वाढवणे गरजेचं असल्याने त्याबाबत राज्य सरकारने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला प्रस्ताव सादर केला होता. त्याला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजुरी दिली आहे.


महाराष्ट्रातील शासकीय आणि खासगी महाविद्यालयात एमबीबीएसच्या एकूण 3,670 वाढवल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 2,020 तर सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीय समाजासाठी (SEBC) 1,650 जागा वाढवण्यात येणार आहेत.


केंद्र सरकारने देशात एकूण 75 वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी राज्यात सिंधुदुर्ग, नंदूरबार, सातारा, परभणी, अमरावती, नाशिक, बुलडाणा येथे 7 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे.


नागपुरात रिजनल इन्स्टिट्युट ऑफ पॅरामेडिकल सायन्स सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. तसेच पुणे मिरज येथे वैद्यकीय महाविद्यालय विशेष पॅरामेडिकल ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्यासही परवानगी मिळाली आहे.