काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या संभाजी कदम यांच्या वीरपत्नीची व्यथा एबीपी माझाने जगासमोर मांडली होती. शहिदाच्या मुलीला शाळेत प्रवेश न देता वीरपत्नीचा अपमान ज्ञानमाता शाळेने केला. या बातमीनंतर नांदेड शहरातील नागार्जुन पब्लिक स्कुलने माझाशी संपर्क करुन शहीदाच्या मुलीला आमच्या शाळेत मोफत प्रवेश, मोफत शिक्षण देऊ अशी तयारी दाखवली. नागार्जुन पब्लिक स्कुल ही शहरातील नामांकित शाळा आहे. सैनिकांप्रती असलेल्या आदरभावनेने आम्ही हा निर्णय घेतल्याचे शाळेच्या संचालिका शैला पवार यांनी सांगितलं.
काश्मीरमधील नागरौता येथे संभाजी कदम शहीद -
संभाजी कदम काश्मीरमधील नागरौता येथे 29 नोव्हेंबर 2016 रोजी शहीद झाले होते. बेस कॅम्पमध्ये असलेल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांचे प्राण संभाजी कदम यांच्यामुळे वाचले होते. संभाजी स्वतः मात्र शहीद झाले. संभाजी यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि सहा वर्षांची तेजस्विनी ही मुलगी आहे. शीतल आपल्या मुलीला शिकवून मोठी अधिकारी बनवण्याची स्वप्न पाहत आहेत. त्यासाठी चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून शहरातील ज्ञानमाता इंग्लिश स्कूलमध्ये त्या गेल्या होत्या. मात्र, मागील वर्षी या वीरपत्नीला परत पाठवण्यात आले आणि यंदाही तीच परिस्थिती आहे. शीतल यांनी शाळेची जी फी असेल ती आपण भरू, मात्र मुलीला शाळेत प्रवेश द्या, असं म्हटलं. मात्र शीतल यांचं काही न ऐकता शाळेने त्यांच्या मुलीला प्रवेश तर दिला नाही, उलट त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.
ज्ञानमाता विद्याविहार ही खासगी इंग्रजी माध्यमाची विनानुदानित शाळा आहे. पण या शाळेला शासनाची मान्यता असल्याने राज्य सरकारचे सर्व नियम या शाळेला पाळणे बंधनकारक असल्याचं शिक्षण विभागाने सांगितलं. माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशात आरक्षण देखील आहे. मात्र, जर ही शाळा हे नियम पाळत नसेल तर तिची मान्यता काढण्याबाबत प्रस्ताव पाठवू, अशी भूमिका आता शिक्षण विभागाने घेतली आहे.
वीरपत्नीला भाऊ म्हणून मदत करणार : आव्हाड
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही एबीपी माझाच्या बातमीची दखल घेतली आहे. नांदेडमधल्या सैनिकाच्या विधवा पत्नीच्या मुलांना ज्या शाळेत अॅडमिशन पाहिजे तिथे घेऊन देणार, एक भाऊ म्हणून त्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा, राहणार असल्याची घोषणा आव्हाड यांनी जाहीर भाषणात केली.
Nanded | माझे पती विनाकारण देशासाठी शहीद झाले, वीरपत्नीची खंत | ABP Majha