Marathwada rain update: राज्यभरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे 21 जणांचा मृत्यू झाला असून मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांच्या पावसाने दाणादाण उडाली आहे.  पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने अनेकांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 12 वर गेली आहे.  नद्या नाले तुडुंब भरले असून अनेक भागांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे. हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिलीय. महाराष्ट्रात 15 ते 19 या चार दिवसांच्या कालावधीत  21 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून यामध्ये सर्वाधिक 8 जणांचा मृत्यू हा एकट्या नांदेड (Nanded)जिल्ह्यात झाला आहे. कुठे किती नुकसान झालंय? किती हानी झाली आहे? पाहूया.

Continues below advertisement


बीडमध्ये पिकांना फटका, अतोनात नुकसान 


मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांची मोठी तारांबळ झाली आहे. बीड जिल्ह्यातील खरीप पिकांवर सर्वाधिक फटका बसला असून तब्बल 2745 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. यातून ८९ गावातील ४९०७ शेतकरी बाधित झाले आहेत.बीड जिल्ह्यात 14 ऑगस्टपासून मुसळधार पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर पाच दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने हाहााकार माजवला. परळी तालुक्यात दोन जणांचा पुरात मृत्यू झाला असून चार जनावरांचा बळी गेला आहे. तसेच दोन कच्ची घरे, चार पक्की घरे आणि तीन झोपड्या कोसळल्या.


तालुका निहाय नुकसान –


बीड : 250 हेक्टर


गेवराई : 700 हेक्टर


माजलगाव : 200 हेक्टर


केज : 1015 हेक्टर


परळी : 560 हेक्टर


अंबाजोगाई : 20 हेक्टर


एकूण : 2745 हेक्टर नुकसानपाच दिवसांच्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.


लातूरमध्ये पिकांवर बुरशी, पावसाचा तडाखा 


लातूर जिल्ह्यात पावसाचा आणखी एक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यंदाच्या खरीप हंगामात औसा, निलंगा, शिरूर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यांमध्ये सुमारे 7100 हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे मुग पिकावर भुरी व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. काही भागात रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने पिकांची पाने पांढऱ्या बुरशीने व्यापली असून झाडांची पाने पिवळी होत आहेत. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शिवाय रोग नियंत्रणासाठी फवारणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शासनाने मदत करावी, अशी मागणी मुग उत्पादक शेतकरी करत आहेत.


एक होतं हसनाळ!


नांदेड जिल्ह्यातील हसनाळ गाव पावसामुळे अक्षरशः पाण्याखाली गेले आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता ड्रोनच्या माध्यमातून गावाची स्थिती पाहण्यात आली. गाव पाण्याने वेढले गेले असून सर्वत्र "एक होतं हसनाळ" अशीच स्थिती दिसून आली. नागरिकांना मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील 18 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीत हसनाळ या गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे आता पर्यंत 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर मुखेड - उदगीर रस्त्यावरील धडकनाळ येथील पुलावरून एक कार आणि एक ऑटोमधील सात जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. यातील 3 जणांना वाचविण्यात उदगीर अग्निशमन दलाला यश आले असून उर्वरित 4 बेपत्ता जणांपैकी 3 जणांचा मृतदेह सापडले आहेत.


धाराशिवात घाणीचं साम्राज्य, बाजारपेठांमध्ये चिखल 


पावसाची संततधार सुरू असल्याने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात चिखल व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील तुंबलेल्या गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे उमरगा बाजारात दररोज सकाळी होणाऱ्या भाजीपाला आणि फळांच्या लिलावात व्यापारी हा माल गटारीच्या पाण्यात ठेवून विक्री करत आहेत. हे दूषित पाणी फळे-भाज्यांमध्ये मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे.नागरिक व व्यापारी यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नाराजी व्यक्त केली असून, लवकरच आरोग्यविषयक समस्या वाढतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.