Maharashtra Rain Updates: राज्यातील (Maharashtra Rain) बहुतांश भागात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. मुंबई (Mumbai Rains) शहरात दुपारपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी तर पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील घाटपरिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर कोकणातही पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबईत पुढच्या तीन तासांसाठी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Continues below advertisement

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता हळूहळू राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. राज्यात अचानक पाऊस वाढण्याचं कारण म्हणजे, पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र. पण, आता हे कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे आता राज्यभरातील पावसाचा जोर ओसरणार आहे. 

छत्तीसगडच्या मध्य भागात आणि परिसरातील सुस्पष्ट कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम-वायव्येकडे सरकलं आणि आज 20 ऑगस्ट रोजी 5.30 वाजता छत्तीसगडच्या मध्य भागात आणि लगतच्या पूर्व मध्य प्रदेशात कमी दाबाच्या क्षेत्रात आणखी कमकुवत झालं आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत ते पूर्व मध्य प्रदेशात पश्चिम-वायव्येकडे सरकत राहण्याची आणि हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.  

Continues below advertisement

मुंबईत अचानक अतिमुसळधार पाऊस का पडला?

मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालंय. त्यामुळेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस पडतोय. सोबतच मान्सूनचे वारे सक्रिय झाले. परिणामी द्रोनीय रेषा तयार झाली आहे, जी उत्तर कोकण ते केरळपर्यंत आहे. त्यामुळेच कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात आणि घाट माथ्यांवर मुसळधार तर उर्वरित राज्यात पावसाच्या सरी कोसळतांना दिसतोय.

मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरीसाठी रेड अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या 48 तास एमएमआरसाठी रेड अलर्ट होता आणि तसाच मुसळधार पाऊसही पडला. अशातच आता सहानंतर हा अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे. आज मुंबईतील काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुपारपर्यंत मुंबईतील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगडसाठी आज देखील रेड अलर्ट कायम असून अतिवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय नाशिक, सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाल्याने पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळालाय. तर विदर्भात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांसह पावसाची शक्यता आहे.

मुंबईत मोठी वाहतूक कोंडी 

मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या अधून मधून जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. बोरिवलीकडून वांद्रे च्या दिशेने जाणारा मार्गावर सांताक्रूझ,विलेपार्ले,अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव दरम्यान ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गोरेगाव ते सांताक्रुझ 15 ते 20 मिनिटांचा प्रवास मात्र वाहन चालकांना एक ते दीड तासांमध्ये प्रवास करावा लागत आहे. खरंतर सकाळची वेळ आहे मोठा संख्या मध्ये चाकरमानी कामासाठी निघाले आहेत मात्र या वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गाची वाहतूक कोंडी काढण्याचे प्रयत्न देखील वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. 

रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट कधी वर्तवला जातो? 

जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार, अतिवृष्टी किंवा ढगफुटीचा अंदाज असतो, अशा वेळी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे, मोठ्या संकटाची शक्यता असते. तर, मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट म्हणजे, आपत्ती येऊ शकते. नागरिक आणि प्रशासन सतर्क असावं यासाठी हा अलर्ट दिला जातो.  हवामान बदलामुळे पुढील काही दिवसांमध्ये संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाल्यास हवामान खात्याकडून यलो अलर्ट दिला जातो. 

पाहा व्हिडीओ : Heavy Rain Alert | मुंबईसह ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट, पुढील ३ तास महत्त्वाचे

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Weather Updates : मुंबईत अचानक एवढा पाऊस का पडतोय? पुणे वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण, पुढील 48 तास महत्त्वाचे