मराठवाड्यात भूरभूरच! ढगाळ आकाश, पुढील पाच दिवस काय राहणार स्थिती?


ढगाळ आकाश. 


राज्यात एकीकडे पुणे,कोल्हापूर भागात पूराने हाहाकार माजवला असताना मराठवाड्यात हवा तसा पाऊस कधी पडणार? असा सवाल आता घरोघरी केला जात आहे. मराठवाड्यात सध्या हलक्या सरींसह पावसाची भूरभूर दिसून येत आहे. पीके जगतील एवढा पाऊस असला तरी धरणपातळीत वाढ होत नसल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या नुसतेच ढगाळ वातावरण असून दिवसभर भूरभूर पावसाची हजेरी आहे.दरम्यान, हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता केवळ ६.२६ टक्क्यांवर गेला आहे. मागील चार पाच दिवसात झालेल्या पावसामुळे दोन टक्क्यांनी ही पाणीपातळी वाढली आहे.


कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?


छत्रपती संभाजीनगर ५९.२ %
जालना ५७.४% 
बीड ६६.८ %
लातूर ६१.२ %
धाराशिव ६५.५% 
नांदेड ४९.२ %
परभणी ४८.७ %
हिंगोली ४७.०० %
_____________
एकूण : ५५.९ %


पुढील पाच दिवस मराठवाडा कोरडाच?


भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस मराठवाड्यात पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आला नसून हलक्या सरींचीच हजेरी राहणार असल्याचे सांगण्यात आले. आयएमडीने मराठवाड्यात पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला असून पुढील पाच दिवस मराठवाड्यात नुसतीच भूरभूर राहणार असल्याचे समोर येतंय.


राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, यापुढे हवामान कसं राहणार आहे. कुठं कुठं पाऊस पडणार आहे? याबाबतची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितली आहे. पुढील चार दिवस म्हणजे 28 ते 31 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव खुळे ( Manikrao Khule) यांनी दिली आहे. संपूर्ण मराठवाडा तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा 15 जिल्ह्यात जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता कमी आहे. केवळ मध्यमच पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले. 1 ऑगस्टपासून या जिल्ह्यांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असल्याचे ते म्हणाले.


मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात तर केवळ मध्यम पावसाची शक्यता आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक 3 ऑगस्टपर्यंतही टिकून राहू शकते, असे जाणवते. छत्रपती संभाजीनगर, जालना हिंगोली या तीन जिल्ह्यात तर सध्या पेरपिके जरी ठिक वाटत असली तरी जोरदार अशा पावसाची शक्यता आहे.  ऑगस्ट मधील मान्सूनचे वर्तनच येथील भवितव्य ठरवेल, असे वाटते.  असेही ते म्हणाले.


हेही वाचा-


पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी होणार, पण 1 ऑगस्टपासून पुन्हा मुसळधार पडणार, वाचा हवामानाचा अंदाज