Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, यापुढे हवामान कसं राहणार आहे. कुठं कुठं पाऊस पडणार आहे? याबाबतची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितली आहे. पुढील चार दिवस म्हणजे 28 ते 31 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव खुळे ( Manikrao Khule) यांनी दिली आहे. संपूर्ण मराठवाडा तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा 15 जिल्ह्यात जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता कमी आहे. केवळ मध्यमच पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले. 1 ऑगस्टपासून या जिल्ह्यांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
मराठवाड्यात काय स्थिती?
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात तर केवळ मध्यम पावसाची शक्यता आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक 3 ऑगस्टपर्यंतही टिकून राहू शकते, असे जाणवते. छत्रपती संभाजीनगर, जालना हिंगोली या तीन जिल्ह्यात तर सध्या पेरपिके जरी ठिक वाटत असली तरी जोरदार अशा पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट मधील मान्सूनचे वर्तनच येथील भवितव्य ठरवेल, असे वाटते.
नंदुरबार धुळे जळगांव सहित संपूर्ण विदर्भातील 14 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता
नंदुरबार धुळे जळगांव सहित संपूर्ण विदर्भातील अशा एकूण 14 जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक 3 ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.
मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता
मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात अतिजोरदार पावसाच्या शक्यतेला अजुन वातावरणीय उतरतीचा धक्का लागलेला नाही. त्यामुळं तिथं पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जायकवाडी व इतर लघु-प्रकल्पातील धरणे वगळता ह्या आठवड्यात जलआवकेच्या सातत्यातून महाराष्ट्रातील सर्व धरणात जलसंवर्धनातून जलसाठा वाढीची टक्केवारी शतकाकडे झेपावत आहे. काही ठिकाणी धरणे ओसंडून वाहत आहेत. जुलैत आतापर्यंत तीन आठवडे ओढ दिलेल्या मान्सूनने जुलै अखेरात महाराष्ट्रासाठी ह्यावर्षी आपल्या वर्तनातून वेगळेच असे हे वैशिष्ठ दाखवून दिले आहे.
मराठवाड्यातील लघु प्रकल्प व जायकवाडीत समाधानकारक साठा करणाऱ्या, तसेच महाराष्ट्रातील शेतजमिनीची पूर्णपणे भूक शमवणाऱ्या व विहीरींना पाणी-पाझर फोडणाऱ्या जोरदार पावसाची संपूर्ण महाराष्ट्राला अजूनही प्रतिक्षा आहेच. कदाचित शेतकऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत ह्यासाठी वाट पहावी लागू शकते. यासाठी ऑगस्ट महिन्यातील मान्सूनचे वर्तन महत्वाचे समजावे.
महत्वाच्या बातम्या:
Vidarbha Rain Update : नुसता धो धो !गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले; मुसळधार पावसाची विदर्भात दाणादाण