Marathwada Rain : सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळे एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे काही ठिकाणी या पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्री हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अनेक गावांमध्ये झालेल्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक नागरिक अडकून पडले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये गावांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. या संपूर्ण पूर परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून यासंबंधीत विचारणा केली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ रेस्क्यू करा आणि योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना कॉल करून सूचना दिल्या आहेत
हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे असेही निर्देश त्यांना दिले.
आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला
आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, वसमत नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदी पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन, केळी, ऊस, उडीद, मूग, कापूस, हळद ही शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान पुराच्या पाण्यामुळं पिकांसह शेतीही खरडून गेली आहे. तर नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरले आहे. तर तालुक्यातील शेलगाव खु, शेलगाव बु, शेणी, कोंढा, देळूब खु, देळूब बु यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या