Marathwada Rain : सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी या पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातही कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळं हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. तसेतच परभणीतही मोठा पाऊस झाला आहे.
शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट
नांदेड जिल्ह्यात काल मध्यरात्री चालू झालेल्या मुसळधार पावसामुळं अक्षरशः हाहाकार घातला आहे. सायंकाळी सुरु झालेल्या या ढगफुटीसदृश्य पाऊसामुळं हजारो हेक्टरावरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. तर शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळं सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळं अगोदरच पाण्याअभावी दुबार पेरणी करावी लागलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा तिबार पेरणीचे संकट उभं राहिलं आहे. तर अर्धापूर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरलं असून गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटला
दरम्यान, आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, वसमत नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदी पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन, केळी, ऊस, उडीद, मूग, कापूस, हळद ही शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान पुराच्या पाण्यामुळं पिकांसह शेतीही खरडून गेली आहे. तर नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरले आहे. तर तालुक्यातील शेलगाव खु, शेलगाव बु, शेणी, कोंढा, देळूब खु, देळूब बु यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
हिंगोली जिल्ह्यात अनेक गावात शिरलं पाणी, नागरिक भयभीत
दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. रात्रीपासूनच जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा किन्होळा आसेगाव गावांच्या शिवारात जोरदार पाऊस सुरु झाला आहे.
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं गावांमध्ये पाणी शिरलं आहे. हे पाणी संपूर्ण गावातील घरात शिरल्यानं नागरिक भयभीत झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी नागरिक घरातील छतावर जाऊन बसले आहेत. ज्या गावातील पाणी ओसरत आहे तिथे प्रशासन मदत करत आहे. ज्या ठिकाणी पाणी वाढत आहे त्या गावातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आसेगावातील पाणी वाढत असल्यानं परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आसेगाव मार्गे नांदेडकडे जाणारा रस्ता पूर्णपणं बंद झाला आहे. पाण्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर प्रशासनाच्यावतीनं आढावा घेण्याचं काम सुरु आहे. पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र, नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत.
परभणीच्या पालम तालुक्यातील 14 गावांचा संपर्क तुटला
परभणी जिल्ह्यात काल झालेल्या पावसानं अनेक छोट्या मोठया नदी नाल्यांना पाणी आलं आहे. पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्याने जवळपास 14 गावांचा संपर्क तुटला आहे. फळा,आरखेड, घोडा,सोमेश्वर, उमरथडी, सायळा, पुयणी, वन भुजवाडी,आडगाव, तेलाजपुर, कांदलगाव यासह इतर 3 गावांचा पालमपासूनचा संपर्क तुटला आहे. दिवसभर हे पाणी ओसारण्याची शक्यता नसल्याने आज दिवसभर या14 गावातील नागरिकांना शहरात जाता येणार नसून गावातच अडकून बसावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या: