Nagpur Metro : नागपूर मेट्रोने महिन्याभरात 16 लाख प्रवासी संख्या पार केली आहे. गेला महिनाभर नागपूर मेट्रोमधून रोज सरासरी 50 हजार नागरिक प्रवास करत असून विकेंडच्या दिवशी तर प्रवासी संख्या 65 हजारापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात निर्बंधामुळे थांबलेल्या मेट्रो प्रवासाला आता गती मिळाल्याचे चित्र आहे. बर्डी ते लोकमान्य नगर आणि कस्तुरचंद पार्क ते खापरी या दोन्ही मार्गांवर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावरील नोकरदार वर्ग, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्या प्रवासासाठी मेट्रोला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. 


नागपूर मेट्रो सुरु झाल्यानंतर सुरुवातीला कुतूहलापोटी मेट्रो प्रवासाला अनेकांनी पसंती दिली होती. प्रवासी संख्या चांगलीच वाढली होती. मात्र कोरोनाकाळात निर्बंधामुळे मेट्रो बंद होती. आता कोरोनाशी निगडित सर्व निर्बंध हटल्यानंतर मेट्रोने प्रवास करण्याकडे नागरिकांचा कल पुन्हा वाढत चालला आहे. शाळांपाठोपाठ महाविद्यालय पूर्णपणे सुरु झाल्यानंतर मेट्रो प्रवासांची संख्या लवकरच दिवसाला एक लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


Pune Metro News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे मेट्रो विस्तरणार; पुलगेट, हडपसर परिसरात धावणार मेट्रो


2019 पासून मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत
नागपूरवासियांची बहुप्रतिक्षित मेट्रो रेल्वे 8 मार्च 2019 पासून सुरु झाली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोला हिरवा कंदील दाखवला होता. रस्ते वाहतुकीवरील ताण लक्षात घेता नागपुरात मेट्रो रेल्वेची मागणी बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित होते. अखेर केंद्र सरकारने फेब्रुवारी 2013 मध्ये नागपूर मेट्रोचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर काम सुरु होऊन नागपूर मेट्रो ही केवळ चार वर्षात प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे 8680 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.


कोरोना व्हायरसमुळे आलेली महामारी आणि त्यामुळे लागलेला लॉकडाऊन यामुळे मेट्रो सेवा बंद होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आणि हळूहळू मेट्रो सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु करण्यात आली. आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्यानंतर नागरिक प्रवासासाठी पुन्हा एकदा मेट्रोला पसंती देत आहे. त्याचा परिणाम प्रवासी संख्येवर दिसून येत आहे. लवकरच ही संख्य वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.