Chhatrapati Sambhajinagar News: राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागत असली तरी मराठवाड्यात (Marathwada Dam water storage) अजूनही पावसाचा जोर म्हणावा तसा नसल्याने धरणप्रकल्पांमध्ये पाण्याची आवक मंदावली आहे. मराठवाड्यात जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) आज केवळ ४.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला असून उर्वरित ठिकाणी धरणांमध्ये पाण्याची हळूहळू आवक होत आहे.


मराठवाड्यात एकूण उपयुक्त पाणीसाठा किती?


मराठवाडयात मागील तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस सुरु आहे. दरम्यान, जुलै महिन्यात जूनच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. त्यामुळे या आठवड़याच्या अखेरीस पाऊस वाढण्याची शक्यता आहे.


मराठवाडा विभागात असणाऱ्या लघू, मध्यम व मोठ्या ९२० धरणप्रकल्पांमध्ये आज केवळ ९.७० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हा सर्वात कमी प्रकल्पीय पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाच्या माहितीवरून दिसून येते.


जायकवाडी धरणात ४.३१ टक्के पाणीसाठा


मराठवाड्यातील सर्वात अधिक पाणीक्षमता असणाऱ्या जायकवाडी धरणात आज (दि ४ जुलै) ४.३१ टक्के म्हणजेच केवळ ३.३० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा २६.५६ टक्के एवढा हाेता.


बीड, हिंगोली, परभणीतील धरणांमध्ये होतेय वाढ


बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील धरणे अजूनही खालावलेल्याच अवस्थेत दिसत असून हिंगोलीचे सिद्धेश्वर धरण अजूनही शुन्यावरच आहे. तर येलदरी धरणाची पाणीपातळी हळूहळू वाढत असून उपयुक्त पाणीसाठा २७.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे.


बीड जिल्ह्यातील माजलगाव, मांजरा धरण अजूनही शुन्यावरच असून या जिल्ह्यांना अजूनही पाण्याची प्रतीक्षाच आहे. नांदेडच्या विष्णूपूरी धरणात ३३.४२ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली आहे.


धाराशिव, लातूरमध्ये समाधानकारक परिस्थिती


धाराशिव, लातूर जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला. परिणामी, धरणसाठ्यात वाढ झाली आहे. धाराशिवच्या सिना कोळेगाव धरणात उपयुक्त पाणीसाठा शुन्यावर असला तरी पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. निम्न तेरणा धरणात १४.७६ टक्के पाणीसाठा आहे. इतर धरणांमध्ये २० ते ५० टक्के पाणीसाठा आहे. लातूरमधील धरणांमध्ये ३० टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा गेला असून बहुतांश धरणांमध्ये ४० -४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.


हेही वाचा:


जुलै महिन्यात पावसाची स्थिती कशी राहणार? कुठं कुठं पडणार पाऊस? सविस्तर माहिती एका क्लिकवर